रविवार, २२ मे, २०२२

'तिची' ठराविक वेळ

आजकाल "मला  माझी स्पेसच मिळत नाही" किंवा "आमच्या घरात मला प्रायव्हसीच मिळत नाही." अशी वाक्यं आपल्याला आपल्याच मित्र-मैत्रिणींकडून किंवा नात्यातल्या लोकांकडून ऐकायला मिळतात. "माझी स्पेस" हा सध्याचा परवलीचा शब्द झालाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हा लेख प्रपंच प्रायव्हसी किंवा स्पेस या विषयांवर भाष्य करण्यासाठी खर्ची घालणार नाहीए ... तसा विचारच नाहीए !. पण इतक्या वर्षांत सहज  बोलण्यांमधून किंवा गप्पा मारताना काही गोष्टी जाणवल्या - विशेषतः स्त्रियांच्या मग त्यांत सगळ्या जणी आल्या .. बहिणी , मैत्रिणी आणि बायको सुद्धा ! साधारणपणे सगळ्यांच्याच दिनक्रमातील एक सवय पाहिल्यानंतर मला एक लक्षात आलं की त्यांची एक ठराविक वेळ आहे. ह्या ठराविक वेळेत त्यांना तुम्हीच काय पण घरातील इतर कोणीही अगदी लहान-सहान काम जरी सांगितलंत तर कदाचित तुम्हांला रण-रागिणीचं रूप पाहायला मिळू शकतं ! ती वेळ म्हणजे - त्यांची एक कप चहा किंवा कॉफी घेण्याची वेळ !

सगळं जग इकडचं तिकडे झालं तरी त्यांना या 'वेळी' फक्त आणि फक्त स्वतःचा सहवास हवा असतो. या वेळेचा पुरेपूर वापर करून घेत त्या संपूर्ण दिवसभर ऊर्जेने प्रफुल्लित राहत काम करत राहतात. त्या वेळेस काम सांगणारं कोणीही असो - आई , वडील , सासू , सून , मुलगा , मुलगी , नवरा , जावई किंवा सासरे देखील ! - त्या दाद देणार नाहीत. अपवाद फक्त तान्ह्या बाळाचा असू शकतो. पण त्यास सांभाळ करणारी व्यक्ती घरी कोणी नसेल तरच ! घरातील पुरुषांनो, तुम्हांला तुमचा सणसणीत अपमान करुन घ्यायचा असेल तर त्यांच्या या ठराविक 'वेळेत' व्यत्यय आणायचं दुःसाहस करा ! पण मुख्य सल्ला असा की पुन्हा विचार करा ! 

काही जणी दिवसातून अनेक वेळेस चहा-कॉफी घेत असतील पण त्यांत एकच वेळ ती स्वतःसाठी राखून ठेवते. ती वेळही तिने स्वतः ठरवून निवडलेली असते.

ज्या वेळेस नवरा ऑफीसला गेलेला असतो, मुलं शाळा-कॉलेजला गेलेली असतात, किचन बऱ्यापैकी आवरलेलं असतं, काम करणारी बाई येऊन गेलेली असते, घरात जेष्ठ नागरिक असतील तर ते पहुडलेले असतात. थोडक्यात घरात शांतता असते , अशा स्वस्थ वेळी ती स्वतःसाठी हवा तसा चहा किंवा कॉफी करते आणि तो वाफाळता कप हातात घेऊन चहा-कॉफीचा आस्वाद घेत तिला हवं ते करते. या वेळेत आणि या वेळेच्या चहा-कॉफी मध्ये तडजोड तिला चालत नाही. नवऱ्याला किंवा सासू-सासऱ्यांना कमी साखरेचा किंवा आल्याचा चहा लागतो म्हणून आपलाही सकाळचा चहा वेगळा कुठे करायचा म्हणून एकच चहा सगळ्यांसाठी करण्याची तडजोड फक्त सकाळी - सार्वजनिक किंवा कौटुंबिक चहासाठी ! या ठराविक वेळेसाठी हा नियम लागू नाही हे ध्यानात ठेवा. ह्या वेळेत तुम्ही चुकून घरी असाल आणि तुम्ही चहा-कॉफी मागितलीत तर ते करून घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच येण्याची शक्यता अधिक ! प्रत्येकीची ही ठराविक वेळ वेगवेगळी असू शकते. तसंच या पेयपानाचा आस्वाद घेताना काय करायचं तेही प्रत्येकीचं ठरलेलं असतं ! काही जणी पेपर वाचतात , काही जणी टी व्ही वर आवडता कार्यक्रम बघतात , काही जणी काहीही न करता फक्त एकेक घोटाचा आस्वाद घेण्याचा आनंद घेतात. कदाचित हा वेळ त्यांचा स्वतःशी गुजगोष्टी करण्याचा पण असू शकतो. हे करताना त्यांची एकमेव ईच्छा - कोणीही काम सांगू नका ! 

म्हणून समस्त पुरुषांना विनंती निदान या वेळेस त्यांना त्रास नका देऊ! हे फक्त 'woman's day' ला नव्हे तर नेहेमीसाठी हे धोरण असू द्या ! उलट कधी तरी सुट्टीचं तुम्ही घरी असाल तर शांतपणे त्यांची ही वेळ शोधा आणि त्यांचं लक्ष जाणार नाही असं त्याचं निरीक्षण करा - दुरुन ! त्यांच्याशी बोलायला किंवा गप्पा मारायला जाऊ नका !  

"मला आता काही काम सांगू नकोस, मी माझी कॉफी घेतेय " 

"मुलगा रडतोय तर तू घे ना त्याला ! तुझा मुलगा नाहीए का तो ? .. मी माझा चहा घेतेय आणि तो झाल्याशिवाय मी उठणार नाही !"

"किती वेळा सांगितलं आहे की मी चहा घेत असताना काही काम सांगू नकोस ! "

"मला माझी कॉफी घेताना उठावं लागलं तर असा संताप येतो ना! .. किती वेळा सांगितलं की फक्त या वेळेस डिस्टर्ब करू नकोस तरी ऐकत नाही .. मी तर लक्षच देत नाही आता ! "

ही आणि अशा तऱ्हेची स्फोटक वाक्यं तुम्ही ऐकली असतील किंवा स्वतः झेलली असतील. त्याला कारणीभूत असलेल्यांपैकी एक प्रमुख कारण आता तुमच्या लक्षात आलं असेलच ! अर्थात हे फक्त स्त्रियांसाठीच लागू होतं असं नाही , प्रत्येकासाठी लागू होत असेल. पण आपण पुरूष एरवीही घरातील स्त्रियांना गृहीत धरत असतोच आणि त्यांचा वेळ आपल्यासाठीच खर्ची पडावा अशा कामांचा भरणा करत राहतो. निदान या त्यांच्या चहा -कॉफी पिण्याच्या निवांत वेळेचा आपण उचित सन्मान आणि आदर ठेवला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्याच स्त्रियांची अशी ठराविक वेळ असतेच असं काही मी ठामपणे प्रतिपादन करतोय असं नाही. किंबहुना जर हे सगळं लिहिलेलं वाचून स्त्री-वर्गातील एखादीला वाटलं की 'पटत नाहीए !' किंवा 'हे असं काही आमची चहा कॉफीची ठराविक वेळ नसते ..काहीही काय !' किंवा तत्सम काहीही तर खुशाल प्रतिक्रियेमध्ये तसं मोकळेपणाने लिहा. 

एक सहज आठवलं - 'लंच बॉक्स ' चित्रपट जर तुम्ही नीट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल कि त्यातील 'ईला' हे प्रमुख स्त्री पात्र तिच्या ठराविक 'चहा' पिण्याच्या वेळेस लंच बॉक्स मधून आलेली चिठ्ठी वाचत असते. असं दोनच दृश्यांमध्ये तरी पाहायला मिळतं ! अर्थात माझं निरीक्षण चुकीचं पण असू शकतं . असो. 

मला जे बघून, ऐकून जाणवलं तेच मी इथे मांडलं आहे. काही अतिशयोक्तीपूर्ण वाटलं तर सोडून द्या पण पटलं तर नक्की विचार करा !

-- 

भालचंद्र ना. देशमुख 

22-05-2022

रविवार, १० एप्रिल, २०२२

ग्रीन बुक : माणूस बदलू शकतो याची साक्ष पटवणारा सिनेमा

खूप दिवसांपासून एक सिनेमा पाहायचा होता - ग्रीन बुक! भारतात - म्हणजे पुण्यात असताना कोणत्याही वाहिनीवर तो लागला नाही पण स्वीडनला आलो आणि नेटफ्लिक्स वर "ग्रीन बुक ... coming soon" असं दिसलं मग ठरवलंच, हा सिनेमा आला की पाहायचाच.ऑस्कर विजेता चित्रपट आहे किंवा वर्णद्वेषाविषयी काही एक सांगू पाहणारा सिनेमा आहे म्हणून उत्सुकता होती असं नव्हे पण विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा फक्त दोन पात्रांविषयी आहे हे वाचल्यावर मला उत्सुकता ही की लिहिणाऱ्यांनी अशी काय कथा आणि संवाद लिहिलेत की पाहणाऱ्यांची तंद्री लागावी ? जेव्हा पुढे कळलं की सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे तेव्हा ही उत्सुकता अजूनच वाढली. अर्थात मी काही चित्रपट समीक्षक नाहीए त्यामुळे मी "ग्रीन बुक" ची समीक्षा वगैरे लिहिणार नाहीए! पण मला त्या सिनेमातलं जे भावलं, पटलं तेच इथे लिहिणार आहे.हा रसास्वाद आहे असं म्हणा हवं तर! 

ग्रीन बुक नावावरून हा सिनेमा ग्लोबल वार्मिंग म्हणजे - जागतिक तापमान वाढ या विषयावर आहे असं वाटण्याची शक्यता असू शकते पण तसं अजिबात नाहीए! चित्रपट १९६० च्या दशकातील अमेरिकेच्या वर्णद्वेषी समाजातील गोऱ्या आणि काळ्या माणसांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीचा आहे. खरं तर खूप गंभीर विषय - पण लेखक-दिग्दर्शक या द्वयीनीं तो मांडलाय किंचित नर्म-विनोदी पद्धतीने! दोनच प्रमुख पात्रं - एक गोरा आणि एक काळा - जणू बुद्धिबळाच्या पटावरील दोन राजे! पण या डावात हे दोघेही जिंकतात - आणि प्रेक्षकही ! शह-काटशह आहेत पण ते संवादातून दोघेही एकमेकांवर करतात. पण या एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या त्यांना घायाळ करत नाहीत तर उलट त्यांचे अहंगंड, दुराग्रह, छोट्या छोट्या सवयींबद्दलचे अट्टाहास आणि त्यातून येणारा अहंकार , "मी"पणा हे सगळे पापुद्रे हळूहळू गळून पडतात आणि सूत जमून जातं ... गाठी पक्क्या बसतात - कायमच्या! 

यांत जे वरचढ पात्र आहे ते आहे - डॉ.डॉन शर्ली - जो आफ्रो-अमेरिकन पियानिस्ट आहे.अत्यंत उत्कृष्ठ पियानो वाजवत असतो आणि आर्थिक दृष्ट्यादेखील समृद्ध असतो. त्याला अमेरिकेच्या दक्षिण भागांत आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन महिने फिरायचे असते. म्हणून एका ड्रायव्हरच्या - वाहन चालकाच्या - शोधात तो असतो. दुसरं पात्रं आहे - जे खरोखर मेषपात्र आहे - ते मात्र मजेदार आहे. वर्णन करायचं झालं तर दणदणीत वळू असतो तसं ते मस्तीखोर पात्र आहे - टोनी लीप त्याचं नाव! इटालियन-अमेरिकन बाऊन्सर म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर गुद्देखोर,उसळचेंडू किंवा उसळखोर गृहस्थ आहे. म्हणजे दारू पिऊन गोंधळ करणाऱ्यांना चोप देत बारच्या बाहेर घालवण्याचं त्याचं काम! त्याचा बार आता बंद होणार आहे - त्यामुळे घर चालवायला काही तरी काम शोधलं पाहिजे नाही तर बायको-मुलांना खाऊ काय घालणार? पण गडी तसा हुशार आणि चाणाक्ष आहे, ज्यांस इंग्रजीमध्ये स्ट्रीट-स्मार्ट म्हणतात तसा! कुठून पैसे मिळणार अशी भनक जरी लागली तरी गडी तिथे हजर! भय,काळजी,भविष्य वगैरे क्षुद्र गोष्टींना फाट्यावर मारणारा कारण त्याच्या बापाने त्याला उपदेश दिलाय जो त्याने गुरूमंत्रा सारखा अंगी बाणवलाय - जगायचं तर १०० टक्के जग, हसायचं असेल तर दिलखुलास हस, काम करताना फक्त कामाकडे लक्ष असू दे, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे - जे काही करशील ते तुझ्या आयुष्यातील शेवटचं काम आहे असं समजून कर - थोडक्यात वर्तमानात राहा - मागेही वळून पाहून नको आणि भविष्याचा पण फार विचार करू नको ! .. एन्जॉय! पठ्ठ्या आहे पण तसाच! क्षुधा (म्हणजे भूक) तर एवढी जबरदस्त आहे की हा प्राणी सतत चरतच असतोच पण ५० डॉलर्सच्या पैजेखातर गडी २६ बर्गर खाऊन तृप्तीची ढेकर देतो. त्याचे ते असे सततचे चरणे बघून आपल्या तोंडाला पाणी सुटत राहते हे पण तितकंच खरं! त्याची बेफिकीर वृत्ती तर हेवा वाटावा अशीच आहे. या दोन्ही पात्रांचे त्यांचे स्वतःचे असे नियम, वागण्या -बोलण्याच्या रीती, खाण्या-पिण्याच्या पध्दती, पूर्वग्रह आणि दृष्टिकोन आहेत.तरीही फक्त दोन महिन्यांच्या प्रवासात दोघे एकमेकांमुळे अंतर्बाह्य कसे बदलतात ते या सिनेमात प्रभावीपणे दाखवलं आहे. 

मला काही संदर्भ आठवतात या निमित्ताने - पु .ल एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते - "प्रत्येक माणूस हे एक वेगळं जग आहे. निसर्गाला आपली कॉपी करायची हौस नाहीए! म्हणून प्रत्येक माणूस हा वेगळा आहे." अजून एका ठिकाणी ते म्हणतात - "कालचा माणूस, आजचा माणूस किंवा उद्याचा माणूस असं काही नसतं, माणूस नावाची एक निखळ गोष्ट आहे जी सगळे भाव घेऊन जगत आणि वावरत असते." या दोन्हींचा प्रत्यय आपल्याला "ग्रीन बुक" बघताना येत राहतो. तर या टोनीला श्यामवर्णी लोकांविषयी फारशी आपुलकी वगैरे नसते - या बाबतीत तो त्याच्या बायकोच्या एकदम विरुद्ध असतो. पण नेमकं ह्यालाच त्याचा बार-मालक डॉ. शर्लीकडे ड्रायवरच्या मुलाखतीसाठी पाठवतो. पैश्यांची भ्रांत असतेच म्हणून दोन महिन्यांसाठी का होईना म्हणून हा पठ्ठ्या नाईलाजाने मुलाखतीसाठी जातो. त्याच्या डोक्यात असतं की एका डॉक्टरला ड्रायवरची गरज आहे पण मुलाखती दरम्यान डॉ शर्ली सांगतो की तो एक निष्णात पियानिस्ट आहे डॉक्टर नाही! हा मुलाखतीचा प्रसंग खरोखर पाहण्यासारखा आहे. डॉ.शर्लीची अदबशीर, शांत स्वरांत ठराविक लयीत बोलायची पध्दत माहेरशाला अली या नटाने अप्रतिम रित्या सादर केली आहे.एक गोष्ट मला खटकली - डॉ शर्ली दिवाणखाण्यात येऊन बसतो एका प्रमुखाची किंवा राजाची वाटावी अशा मोठ्या खुर्चीवर जी दिवाणखाण्यात ठेवलेल्या इतर खुर्च्यांपेक्षा किंचित उंचीवर ठेवलेली! इथे प्रथम अहंकाराचे दर्शन होतं - मला प्रश्न पडला की डॉ शर्लीचा हा मिजास कशासाठी? हे दाखवण्यासाठी की मी माझ्या कलेच्या जोरावर हे स्थान मिळवलं आहे आणि बाहेरचं जग,समाज मला माझ्या वर्णामुळे मला एक व्यक्ती म्हणून किंवा कलावंत म्हणून जो सन्मान मिळायला हवा तो जर देत नसेल तर मी निदान माझ्या घरात तरी स्वतःला देणार! इथे मला विजय तेंडुलकर यांच्या "कन्यादान" नाटकाच्या सूत्राची आठवण होते - पिळवणूक झालेल्यांना संधी मिळाली की तेही पिळवणूकच करतात.अर्थात डॉ.शर्ली आपला आत्मसम्मान किती जपतो याची प्रचिती या पहिल्या प्रसंगापासून प्रेक्षकांना यावी म्हणून लेखक-दिग्दर्शकाने हे योजिले असावे! पण ही प्रचिती वारंवार येत राहते. 

डॉ.शर्ली टोनीला स्पष्ट सांगतो कि त्याला फक्त ड्रायवर नकोय तर एक व्यक्तिगत सहकारी हवाय जो त्याची राहायची व्यवस्था बघेल, त्याचे कपडे इस्त्री करेल, बूट पॉलीश करेल, त्याला हवा तसा पियानो आयोजकांनी तयार ठेवला आहे की नाही? हे देखील तपासून घेईल आणि विशेष म्हणजे स्वतःही टापटीप राहील. 
पण टोनीला अशा चांगल्या (? ) सवयी कुठे असतात? 
तो सरळ सांगतो - "मी काही बटलर नाहीए! मी फक्त ड्रायविंग करेन .. तुला तुझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवण्याची माझी जबाबदारी! ह्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही!" इथेच वाटाघाटी फिस्कटतात - हे म्हणजे आपल्या भारत-पाकिस्तान चर्चेसारखं! 
त्या बरोबरच आणखीन दोन महत्वाचे प्रश्न डॉ.शार्ली टोनीला विचारतो,"एका काळ्या माणसाचा ड्रायवर व्हायला तुझी काही हरकत आहे का?" मनात पूर्वग्रह असूनही केवळ चांगले पैसे मिळणार म्हणून किंवा काही दुसरा पर्याय नसल्यामुळे "मला काही प्रॉब्लेम नाही!" असं टोनी सांगतो. 
पुढे डॉ.शर्ली विचारतो - "दोन महिने माझा दौरा असणार आहे आणि त्याच दरम्यान ख्रिसमस आहे तर तुझ्या बायकोस हे चालणार आहे का ?" 

टोनी म्हणतो - "मी तिला समजावून सांगेन पण खरंच ख्रिसमस पर्यंत आपल्याला येणं जमणार नाही का?" 
डॉ.शर्ली म्हणतो - "माहीत नाही .. बघू!" पण एकूणच डॉ . शर्लीच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या माणसाला मुलाखतीसाठी बोलावलं आहे.म्हणून तो टोनीची बोळवण करतो - "धन्यवाद इथे आल्याबद्दल ! दोन जणांनी तुझंच नाव सुचवलं पण माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत." एवढं सगळं होऊनही टोनीच्या पत्नीची रीतसर परवानगी घेऊन डॉ.शर्ली टोनीलाच ड्रायवर म्हणून निवडतो आणि आपल्याबरोबर प्रवासास घेऊन जातो..... त्यांच्यातील बदलाला आणि प्रवासाला एकदमच सुरूवात होते. 

हा प्रवास चित्रपटातच पाहण्यासारखा आहे. मी उगाच इथे शब्दांचे खेळ करून चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपवू इच्छित नाही. डॉ.शर्लीचा आणि टोनीचा दोन टोकांपासून सुरु होणारा प्रवास ख्रिसमसच्या दिवशी मैत्रीचे घट्ट बंध तयार करूनच संपतो .... दोघेही जोपर्यंत हयात होते तोपर्यंत हे बंध सुटले नाहीत उलट अधिकाधिक घट्ट होत गेले. 

एका महालासारख्या घरात एकटा राहणारा डॉ.शर्ली! त्याच्याच समाजात केवळ तो चारचौघांसारखा सामान्य नाही म्हणून कोणी त्याला आपला मानत नाहीत हे त्याचं शल्य! उलट उच्चवर्णीय, श्वेतवर्णी लोक केवळ त्यांची "सांस्कृतिक उंची" (?) प्रदर्शित करता यावी म्हणून या उत्कृष्ठ पियानिस्टला कार्यक्रम करायला निमंत्रण देतात पण कार्यक्रम संपल्यावर त्यास कृष्णवर्णीय असल्याची आठवण देखील करून देतात, ही टोचणी त्याला आहे. हे सगळं एका प्रसंगी उद्वेगाने डॉ.शर्लीच्या तोंडून बाहेर पडते तेव्हा टोनीला लक्षात येते कि शर्ली काय काय आणि कसं सहन करतोय. त्याचा कृष्णवर्णीयांविषयी असलेला पूर्वग्रह गळून पडतो. शेवटी सहवास लाभल्याशिवाय तुम्हांला माणूस कळत नाही हेच खरं! माणूस बदलू शकतो हे पण हा चित्रपट पटवून देतो. या चित्रपटाचं नाव "ग्रीन बुक" का ठेवलं आहे ते देखील तुम्हांला चित्रपट पाहताना कळेल. 

तर तुम्ही पण "ग्रीन बुक" चा हा अंतर्मुख करणारा प्रवास नक्की अनुभवा ...... या प्रवासाची वेगळीच मजा आहे जी बराच काळ मनात रुंजी घालत राहते..... निदान मी तरी माझ्यापुरतं ते अनुभवतोय! 

-- भालचंद्र देशमुख 
 १० एप्रिल २०२२

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

…आणि यंत्रे बोलू लागली !


”कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) ही सगळ्यात मोठी जोखीम असून त्यापासून संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका आहे. मी हा धोका वारंवार दाखवत आहे” ‘टेस्ला मोटर्स’चा मुख्य कार्यकारी अधिकारी ईलन मस्क अमेरिकेच्या राष्ट्रीय राज्यपाल (Governor) संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होता. त्याला पार्श्‍वभूमी होती फेसबुकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात चालू असलेल्या संशोधन कार्यक्रमाची! फेअर (FAIR- Facebook Artificial Intelligence Research Lab) ह्या फेसबुकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विभागाची फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटसाठी नवीन काहीतरी देता येईल का याची चाचपणी करणे चालू होते. या गटाने चॅट बॉट्स (chat bots) संशोधित केले होते. साध्या सोप्या भाषेत सांगायच तर दोन मशिन्स बनवल्या ज्या माणसाला समजेल अशा इंग्रजी भाषेत संवाद साधू शकतील. हे साधण्यासाठी या मशीनमध्ये संगणक आज्ञावल्या (Computer Program) आधीच पुरविण्यात आल्या होत्या. ईलन मस्क मात्र हे पहिल्यांदाच बोलत होता असे नाही आणि तो एकटाच हा धोका बोलून दाखवत होता असेही नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज हे देखील हा धोका दाखवताना म्हणत होते “मानवी मेंदू जीवशास्त्रदृष्ट्या पुढे जात असले, प्रगती करत असले तरी भविष्यात तो मशिनच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मागे पडेल. बिल गेटस्‌ पण कृत्रिम बुद्धिमत्तेवर जाहीर चिंता व्यक्‍त करत होते.
पण फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला मात्र ईलन मस्कची मते पटत नव्हती. त्याने मस्कची खिल्ली उडवत माध्यमांना सांगितले ”काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय असते. असे ना-ना करणारे लोक (Naysayers) चांगल्या गोष्टींविषयी अपप्रचार का करतात मला कळत नाही. न जाणे कोणत्या वायफळ भीतीपायी असे गैरजबाबदार विधाने लोक करतात आणि गैरसमज पसरवतात.” अर्थात इलन मस्क आणि झुकरबर्गमध्ये हे वाग्‌युद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्ताने चालू आहे. ईलन मस्कने हे ऐकल्यावर “मी झुकरबर्गशी बोललो आणि त्याची कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ज्ञान मर्यादित आहे’ असे ट्‌वीट केले. हे वाग्‌युद्ध शिगेला असतानाच “फेअरमध्ये एक अशी घटना घडली की, फेसबुकला आपला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात सुरु असलेला कार्यक्रम बंद करावा लागला. हो चॅट बोटस्‌ निर्मितीचा कार्यक्रम बंद करावा लागला!
त्याच असं झालं की, ‘फेअर’चे संशोधक चॅट- बॉटस्‌ (Chat bots) म्हणजे माणसाला समजले अशा भाषेत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या यंत्रामध्ये सुधारणा घडवण्यासाठी व्यस्त असताना त्यांना लक्षात आले की, ही यंत्रे (ज्यांना संवाद वाहक dialogue Agents म्हणतात) आपली स्वत:ची भाषा तयार करत आहेत आणि ती भाषा वापरत एकमेकांशी संवाद साधत आहेत. हे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होते. त्यातील विशेष आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ही भाषा ह्या यंत्रांनी कुठल्याही मनुष्य मदतीशिवाय तयार केली होती. फक्‍त इंग्रजीमधेच संवाद साधायचा असे संगणक आज्ञावलीद्वारे स्पष्ट आदेश असूनही ही मानवनिर्मित यंत्रे स्वतंत्र भाषा तयार करत होत्या. जी त्यांच्या निर्मात्यांनाच कळत नव्हती ! हाच धोका ईलन वारंवार बोलून दाखवत होता. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढे जात असताना त्यावर नियंत्रण (Regulation) करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. असे त्याचे म्हणणे किती रास्त होते असे या घटनेनंतर लक्षात येते. उद्या गुगल चालक विरहित गाडीने अपघात केला तर दोषी कोणाला धरणार ? गुगलला, गाडीच्या मालकाला की जो गाडी चालवतच नव्हता ?
टर्मिनेटर, ट्रान्सफॉर्मर्स किंवा बॉलीवूडमधील रजनीकांतचा ‘रोबोट’ह्या चित्रपटातील काल्पनिक घटना भविष्यात खऱ्या होतील की काय अशी भीती वाटेल हे दर्शवणारी ही घटना एक नांदी असू शकते. गमतीशीर विरोधाभास हा की नव्वदीच्या आधी जेव्हा संवादाची साधने केवळ पत्र, तार यापुरती मर्यादित होती. तेव्हा आस्थेने, गरजेपोटी का होईना संवाद साधले जात होते आणि नातेसंबंधाची मैत्रीची वीण पक्की होत होती. आज मात्र नेमकी उलटी परिस्थिती आहे. संवादासाठी ढीगभर साधने उपलब्ध असताना माणसांमधील संवाद हळूहळू कमी होत चालला आहे. त्याच्या एकदम विपरित-मानवनिर्मित यंत्रांना एकमेकांशी संवाद साधावासा वाटतो आणि त्यासाठी ती स्वत:ची भाषाही बनवू इच्छितात. जी कोणालाही कळणार नाही. ही भाषा कळली नाही तरी चालेल पण ह्या घटना माणसाला काय संकेत देतात, ईलन मस्क काय कळकळीने सांगू पाहतो एवढं कळलं तरी पुष्कळ आहे.a
( 'दैनिक प्रभात' वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीवर २ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला ब्लॉग.
लिंक : http://www.dainikprabhat.com/आणि-यंत्रे-बोलू-लागली-प्/ )

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

तुम्हारी सुलु : स्वप्न खरी होतात !



सतत कोणी तरी आपल्याला अनुल्लेखाने मारत राहत असेल आणि आपल्याच माणसांकडून आपली उपेक्षा होतेय असे एकदा लक्षात आले की मग कधी तरी माणूस पेटून उठतोच. या सगळ्यांना काही तरी करून दाखवायचेच हा ध्यास होतो आणि मग त्यातून येणारी उर्मीच आपल्या हातून काही तरी विलक्षण घडवते. याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित "तुम्हारी सुलु" हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा. "when there is will there is a way" या उक्तीला पुरेपूर खरा उतरणारा हा सिनेमा म्हणता येईल. मुंबईत राहणारी आला क्षण पुरेपूर आनंदाने जगणारी गृहिणी सुलोचना म्हणजेच 'सुलु' हिचा गृहिणी ते आर.जे. म्हणजे रेडिओ जॉकी होण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपटाची एका वाक्यात सांगायची गोष्ट ! तो प्रवास दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी रंजकतेने, अगदी गाण्यांचाही कुठेही कंटाळा न येता, मधे-मधे  पेच टाकत छान दाखवला आहे. सुरेश त्रिवेणी हे खरं तर जाहिरात क्षेत्रातील दिग्दर्शक! 'मौका मौका' ही २०१५ क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिरातीचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांचा चित्रपट दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न! पण त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झालेत असे म्हणावे लागेल.

चित्रपट सुरू होतो सुलूने भाग घेतलेल्या चमचा-लिंबू शर्यतीपासून ज्यात ती दुसरा क्रमांक पटकावते पण पारितोषिक वितरण झाल्यावर पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर उभे राहून नवऱ्याला फोटो काढायला सांगते. इथूनच तिच्या स्वप्नाळू स्वभावाची झलक दिसते.आतापर्यंत डोळ्यात भरेल अशी काही कामगिरी तिच्या नावावर नसली तरी तिची स्वप्नं खूप मोठी आहेत. तिने काहीही नवीन करण्याचं सुचवलं किंवा ठरवलं तर तिला मागे खेचणारे तिचे वडील आणि कर्त्या सवरत्या, बँकेत नोकरी करण्याची मिजासी मिरवणाऱ्या दोन जुळ्या बहिणी आहेत. नवऱ्याचा थोडा पाठिंबा आहे पण तो बिचारा त्याच्याच नोकरीत इतका वैतागला आहे की त्याची खंबीरपणे उभे राहण्याची वेळ येते तेव्हा तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो. म्हणजे पाठिंबा असून नसल्यासारखाच! या सगळ्यांना काहीतरी भरीव आणि उल्लेखनीय करून दाखवायची संधी नियती सुलूला देते. ती संधीही कशी मिळते हे गमतीशीररित्या चित्रपटात दाखवले आहे. शिवाय गृहिणीला बाहेरच्या जगात कशी दुय्यम वागणूक दिली जाते याचा प्रत्यय देखील आपल्याला येतो. एका रेडिओ चॅनेल ची प्रमुख मारिया (नेहा धुपिया), हिचे तिच्या गीतकाराशी भांडण झाल्याने, सुलुला रेडिओ जॉकी म्हणून नोकरी देते. पण ती असते रात्री अपरात्री वेळ जावा म्हणून फोन करणाऱ्या रिक्षा चालक, ट्रक ड्राइवर इत्यादी लोकांना शृगांरिक लहेजात चटकदार उत्तर देणाऱ्या एका कार्यक्रमाची निवेदक म्हणून! साहजिकच त्या कार्यक्रमासाठी रात्रीच यावे आणि जावे लागणार! शिवाय कार्यक्रमाचे स्वरूप पाहता मध्यमवर्गीयांसाठी निषिद्धच! म्हणून तिला सुरुवातीला घरातूनच विरोध सुरू होतो. पण तिचा नवरा (मानव कौल)"काही दिवस करून बघ" या अटीवर तयार होतो. इथून आर जे म्हणून तिचा प्रवास सुरू होतो आणि ती यशस्वी होत असताना , पैसे कमवत असताना घराकडे आणि विशेष करून मुलाकडे दुर्लक्ष होत राहते. दरम्यान तिचा नवरा देखील नवीन मालकामुळे निराश झालेला असतो म्हणून तोही हळूहळू तिची साथ सोडू लागतो पण सुलु हे काम सुरू ठेवण्यावर ठाम असते. "मैं ये कर सकती" असे निरोप मारियाला पाठवणारी सुलु, खरंच ते काम यशस्वीरित्या पेलून दाखवते आणि सर्वाधिक टी.आर.पी मिळवते. एका वयस्कर विधुराशी पण बोलण्याचा प्रसंगही  सुलु खूप छान हाताळते आणि कधी काळी आर.जे. असलेल्या आयुषमान खुराणाला तिची स्वाक्षरी घेण्याचा मोह आवरत नाही. दिग्दर्शकाने असे छोटे छोटे प्रसंग छान गुंफले आहेत. हे चालू असताना अचानक एक अशी घटना घडते की ती कोसळते आणि नोकरी सोडण्याचे ठरवते. पण परत शेवटी यातूनही ती मार्ग कसा काढते आणि नवऱ्यालाही आधार देत आपले आवडते काम कसे चालू ठेवते हे पडद्यावरच बघणे उचित ठरेल.

विद्या बालनने धमाल काम केलंय! तिच्या उत्कृष्ठ अभिनयाने चित्रपट कमालीचा रंजक झालाय आणि मानव कौलने पण नवऱ्याच्या भूमिकेचे सोने केले आहे . दोघांनींही मध्यमवर्गीय नवरा बायको छान उभे केले आहेत. सुलूला ने-आण करणाऱ्या कॅबची स्त्री- ड्राइव्हरने पण छान काम केलंय. सुलूला येणाऱ्या अडचणी आणि तिचं दुःख, घराकडे असलेली ओढ हे सगळं तिलाच समजत असतं कारण ती त्यातून गेलेली असते. गीतकाराची भूमिका करणाऱ्या विजय मौर्यने व्यावसायिक गीतकार अफलातून उभा केलाय आणि नेहा धुपियाने कधी नव्हे ते उत्तम काम केले आहे. छोट्याशा भूमिकेत विभावरी देशपांडे लक्षात राहते. गाणी फारशी श्रवणीय नसली तरी ती चित्रपटाला पुढे घेऊन जातात त्यामुळे त्याचा उपयोग प्रवास चालू ठेवण्यासाठीच होतो. मि . इंडिया मधले 'हवा हवाई' गाणे परत वेगळ्या रूपात पाहायला छान वाटते आणि आपल्याला नॉस्टॅल्जिक वाटते. एकूण चित्रपट छान मनोरंजन करतो आणि कुटुंबाबरोबर पाहण्याचे चित्रपट कमी बनत असताना असा मनोरंजक चित्रपट पाहायला मिळत असेल तर ते तुम्ही चुकवू नये एवढंच मी म्हणेन!

(वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेल्या "तुम्हारी सुलू" या चित्रपटाचे परीक्षण ) 

'तिची' ठराविक वेळ

आजकाल "मला  माझी स्पेसच मिळत नाही" किंवा "आमच्या घरात मला प्रायव्हसीच मिळत नाही." अशी वाक्यं आपल्याला आपल्याच मित्र-मैत्...