राजनाथ
सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला
दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त्यांत त्यांनी त्यांचा
१९७५ सालच्या आणीबाणीचा अनुभव सांगितला. ते तुरूंगात असतानाच त्यांच्या आई ब्रेन
हेमरेज झाल्याने २७ दिवस रुग्णालयात होत्या आणि त्यातचं त्याचं निधन झालं. तर
त्यांनी नातेवाईकांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती केली की त्यांना
अंत्यसंस्कार आणि क्रियाक्रम करण्यासाठी परॉल दिला जावा. पण त्यांना तो मिळाला
नाही आणि त्यांना अंतिम दर्शन देखील घेऊ दिले नाही. हे सांगताना राजनाथ सिंग
ह्यांचे डोळे पाणावलेले दिसले. असे असंख्य अनुभव तत्कालीन भारतीय नागरिकांचे असतील
! तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी आणीबाणीच्या नावाखाली जी दमनशाही
राबवली त्याची मी इथे उजळणी करणार नाहीए ! पण आज तशी परिस्थिती आहे का ? हा प्रश्न
ह्यासाठी उपस्थित केला कारण नुकताच केंद्र सरकारने २५ जून हा दिवस “संविधान हत्या
दिवस” म्हणून जाहीर केलाय. कारण काय तर २५ जून १९७५ च्या काळ्या अध्यायाची आठवण
प्रत्येक सरकारला राहील आणि पुन्हा कोणी ती चूक करणार नाही. उद्देश चांगला पण
नामकरण मात्र मोदींच्या राजकीय खेळीला अनुसरूनच ! त्यातील ‘हत्या’ या शब्दामुळे
कॉंग्रेस पक्ष, त्यांचे समर्थक, डावे पत्रकार, विचारवंत, लेखक, कलाकार ह्यांच्या
नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.
काही पत्रकारांनी तर कहरच केलाय. १९७५ सालची आणीबाणी ही पूर्णपणे संवैधानिक होती
आणि तत्कालीन परिस्थितीनुसार ती बरोबरच होती असं म्हणत त्या घटनेला त्यांनी न्याय्य
ठरवलं आहे. हा दावा तर्कसंगत तर नाहीच पण असत्य देखील आहे. कारण तत्कालीन
परिस्थिती जर इतकी अराजकसदृश्य होती तर पंतप्रधान इंदिरा गांधीनी शासकीय यंत्रणा
वापरून ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न का केला नाही ? इलाहाबाद उच्च
न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंशत: स्थगिती दिलेली असतानाही
अंतिम निर्णयाची वाट न पाहता २५ जूनला इंदिरा गांधीनी संपूर्ण मंत्रिमंडळाला
विश्वासात न घेता आणीबाणी जाहीर केली. म्हणजे तत्कालीन परिस्थिती अराजकसदृश्य होती
हा उघड खोटेपणा आहे. हे पक्षकार ( पत्रकार नव्हे ) असं धडधडीत खोटं बऱ्याच वेळेस
बोलत असतात आणि ते आता त्यांच्या अंगवळणी पडलं आहे. बरं, अराजकसदृश्य परिस्थिती
नियंत्रित करायची म्हणून जो आणीबाणीचा निर्णय घेतला तो घेतल्यानंतर खरोखर अराजकता
( सदृश्य नव्हे) निर्माण होईल अशी पावलं का उचलली? सगळ्या विरोधकांना विना-चौकशी
अटक करणे, स्वत:च्या मर्जीतील न्यायाधीशांची नेमणूक करणे, त्यांच्या एका टोकाकडून दुसर्या
टोकाच्या ठिकाणी बदली करणे, मनमानी पद्धतीने घटना दुरुस्ती करणे, अभिव्यक्ती
स्वातंत्र्यावर बंदी, प्रेसवर बंदी, बातम्यांवर सेन्सॉरशीप लादणे, संजय गांधी जे
कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते त्यांनी बळजबरीने राबवलेली नसबंदीची मोहीम ज्यांत
बऱ्याच लोकांचा झालेला मृत्यू ! मग हा निर्णय न्याय्य कोणत्या दृष्टीकोनातून ठरतो
? भारतीय राज्य घटनेच्या चारही स्तंभांचा म्हणजे - संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि
प्रसार माध्यमे - अनिर्बंध वापर करून सगळे नियम, कायदे धाब्यावर बसवून जनतेचे हाल
केले आणि विरोधाचा आवाज दाबला! ही संविधानाची ‘हत्या’ नाही तर काय ‘पुनर्जन्म’
म्हणायचा का ? विरोधी पक्षातील सर्व नेते जवळपास नऊ महिने तुरूंगात होते. एवढंच
नव्हे तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आणीबाणी विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर “आणीबाणीच्या
काळात वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार (कलम २१) निलंबित करण्यात आलेला आहे.
म्हणजेच कोणीही मनमानी अटके विरुद्ध न्यायालयीन दिलासा मागू शकत नाही” असा पाच
न्यायाधीशांच्या पीठाने ( चार विरुद्ध एक ) निकाल दिला. न्यायमूर्ती एच. आर. खन्ना
यांनी विरुद्ध निकाल दिला. १९७७ साली कॉंग्रेसने जेष्ठतेनुसार त्यांना मिळणारे मुख्य
सरन्यायाधीशपद नाकारून एम. एच. बेग यांची नियुक्ती केली. त्यामुळे त्यांनी
निषेधार्थ राजीनामा दिला. तशीच अवस्था इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल
सिन्हा ज्यांनी इंदिरा गांधीं विरुद्ध निकाल दिला त्यांची झाली. गुणवत्ता असूनही
त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली गेली नाही. ह्या
सगळ्या घटनांमध्ये इंदिरा गांधींची सूडबुद्धी दिसते की हे ‘पिनोक्यो’ पक्षकार
म्हणतात तसा त्यांचा उदारमतवाद ? ह्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की जे.पींनी
देशाच्या सैन्याला आणि पोलीसांना तत्कालीन बेकायदेशीर सरकारचे आदेश न पाळता उठाव
करण्याचे आवाहन केले होते. शिवाय गुजरात आणि बिहार येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन
चालू होते. त्यामुळे अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होतीच. त्यामुळे आणीबाणी
कदाचित समर्थनीय नसेल पण ‘अपरिहार्य’ होती. भारतीय सैन्याने किंवा पोलीसांनी केवळ
विरोधी पक्षातील नेत्याने आवाहन केले म्हणून सरकार विरुद्ध उठाव केलाय असा भारताला
तरी इतिहास नाही. १९७१ चं युध्द जिंकल्यावर भारतीय सैन्य इंदिरा गांधींच्या सरकार विरुद्ध
असे काही करेल ह्यावर कोणाचा विश्वास बसेल ? उलट ज्या न्यायपालिकेकडून न्याय्य
भूमिकेची आणि न्यायाची अपेक्षा होती त्यांनी इंदिरा गांधींपुढे अक्षरश: मान तुकवली
आणि ‘इंदिरा इज इंडिया and इंडिया इज इंदिरा’ हे त्यांचेच म्हणणे
संपूर्ण भारताला खरे करून दाखवले !
आता
ही पार्श्वभूमी लक्षात घेता आज अशी परिस्थिती आहे का ? सरसकट विरोधी पक्षातील
नेत्यांना, समर्थकांना अटक केली जातेय का ? उलट असे दिसते की विरोधी पक्षातीलच
नव्हे, विरोधी विचारांचे लोक, पत्रकार, विचारवंत, लेखक अगदी खालच्या पातळीवर जाऊन
सरकारवर टीका करतातच पण पंतप्रधान मोदींची देखील शेलक्या शब्दांत हेटाळणी करतात.
फेसबुक, एक्स ह्या समाजमाध्यमांवर मोदींना अक्षरश: अर्वाच्च्य भाषेत शिव्या देतात.
विनोदाची पातळी आणि दर्जा मग तो stand up
मध्ये असो की व्यंगचित्रांमध्ये घसरलेला दिसतोय. टी व्ही वरच्या चर्चा किंवा podcast बघा – खुली, अविरत, बेसुमार आणि
अव्याहतपणे टीका सुरू आहे. यातील कोणावर कारवाई तीही सरकारने सूडबुद्धीने केल्याचे
दिसत नाही. खुद्द राजधानी दिल्ली मध्ये मोदींच्या नावाने हास्य-कविता सादर केल्या
जात आहेत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर मग अजून काय आहे ? ह्यांच्या लेखी
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एकच – एखाद्या विशिष्ट समूहाच्या भावना दुखावल्या
जातील असं बोलण्याचं, लिहिण्याचं किंवा कलाकृतीद्वारे मांडण्याचं स्वातंत्र्य
म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य! पण ह्या स्वातंत्र्याबरोबर जी एक आपसूक जबाबदारी
येते त्या जबाबदारीचा ह्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो. तुम्हांला कितीही पटलं
नाही, आवडलं नाही तरीही नरेंद्र मोदी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून, जिंकून
लोकांमधून निवडून आले आहेत... एकदा, दोनदा नव्हे तीनदा ! अर्थात ते किंवा त्यांचा
पक्ष अगदीच स्वच्छ, निकोप आणि जबाबदारीचे राजकारण करत आहेत असे मला अजिबात
म्हणायचे नाही. इतर पक्षातील अनेक गुंड आणि गणंग लोकांना घेऊन भाजपची प्रतिमा
जनमानसात खराबच झाली आहे. शिवाय ह्या सरकारचे काही निर्णय मला वैयक्तिक रित्या
मान्य नाहीत. पण काही तरी अराजक, भयंकर वातावरणाची आभासी निर्मिती करून लोकांची
दिशाभूल करणे ह्या पक्षकारांनी आता थांबवले पाहिजे. मोदींचे एक बरे आहे की ते एका
मर्यादेपलीकडे ह्या मंडळींना उत्तर देण्याच्या फंदात पडून वेळ वाया घालवत नाहीत,
ते आपले काम करत राहतात.
२०१४ पूर्वी ह्या डाव्या पत्रकारांचा असा आक्षेप होता की मोदी सत्तेत आले की
राज्यघटना बदलून टाकतील. त्याला कदाचित एक कारण असे असेल की त्यांचे पूर्वसुरी आणि
जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना एक राज्यघटना पुनर्विलोकन
समिती ( Constitution Review Committee - २००० ) नेमली होती. तेव्हाही अशीच आवई
उठली होती की ह्यांना घटना बदलायची आहे. त्या समितीचा अहवाल आल्यावर भरपूर गदारोळ
उठला होता. मोदी हे वाजपेयींपेक्षा अधिक कट्टर हिंदू आहेत असा सार्वत्रिक समज
असल्याने ते तर नक्कीच घटना बदलतील असा भ्रम लोकांमध्ये पसरवून देण्यात आला. पण
गेल्या ११ वर्षांत मोदींनी असे काहीही केल्याचे सोडा पण प्रयत्न केल्याचेही आढळत
नाही. ह्याचं एक उदाहरण म्हणजे एन.जे.ए.सी सारखी घटनादुरुस्ती सर्वोच्च
न्यायालयाने रद्द ठरवल्यावर देखील तो निर्णय बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.
उलट भारतीय संविधान प्रति लोकांची जागरुकता वाढावी म्हणून त्यांनीच २६ नोव्हेंबर
हा दिवस अधिकृतरित्या “संविधान दिवस” म्हणून जाहीर केला आणि तो दरवर्षी सरकार
तर्फे विविध चर्चासत्रे आयोजित करून साजरा केला जातो. हे कॉंग्रेसला किंवा
त्यांच्या समर्थक पत्रकारांना का सुचले नाही ? राज्य घटना लागू झाल्यापासून घटनेची
सर्वाधिक पायमल्ली करण्याचे पाप कॉंग्रेसकडेच जाते. कॉंग्रेसच्या केंद्रातील
सरकारने आणि विशेष करून इंदिरा गांधी पंतप्रधान असताना संविधानातील ३५६ कलमाचा
सर्वाधिक गैरवापर करून त्यांनी कित्येक लोकनियुक्त राज्य सरकारे क्षुल्लक
कारणावरून बरखास्त केली होती. मोदी सरकारने फक्त एकदा उत्तराखंड सरकार बरखास्त
करायचा प्रयत्न केला पण तो सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसल्यामुळे अंगलट आला.
त्यानंतर त्यांनी असा काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. मणिपूर आणि पश्चिम बंगाल
मध्ये हिसांचार वाढलेला असतानाही तिथली सरकारे बरखास्त केली नाहीत किंवा तसा
प्रयत्न पण केला नाही. मणिपूर मध्ये अलीकडे राष्ट्रपती राजवट लावली गेली जेव्हा
मुख्यमंत्री बिरेनसिंग ह्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना द्यायला लावला. जम्मू
काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती पण ३७० कलम रद्द करण्याच्या तयारीचा
भाग म्हणून ते उचलेले पाऊल होते. खरी भीषण परिस्थिती सध्या पश्चिम बंगाल मध्ये
आहे. पण तिथल्या सरकार पुरस्कृत भ्रष्टाचाराबद्दल आणि हिंसाचाराबद्दल हे साक्षेपी,
विद्वान पत्रकार आणि विचारवंत एक शब्द बोलत नाही. ह्यांचे मौन म्हणजे ह्या सगळ्या
प्रकाराला मूक संमती मानायची का ? त्यामुळे विद्यमान केंद्र सरकार घटनेची पायमल्ली
करतेय असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाहीच पण पुरावा देखील नाही. विरोधी विचारांना सरळ
“देशद्रोही” ठरवले जातेय. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत,
अटक करून विनाकारण तुरुंगात डांबून ठेवले जात आहे, असाही एक आरोप ह्या सरकारवर
आहे. तो काही प्रमाणात रास्त असेलही. पण असे असते तर जे उघडपणे सरकार विरुध्द गरळ
ओकत मुलाखती देत फिरत आहेत ते मोकळे कसे ? ज्यांना अटक केली होती त्यातील काहींना
न्यायालयांनी जामीन देखील दिला आहे. काहीचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. पण
म्हणून सगळ्यांनाच आत टाकलंय असं दिसत नाही ! मोदी द्वेषाची कावीळ झाल्याने ह्या
मंडळींना सगळंच पिवळं दिसतंय ! ह्याच पीतदृष्टीच्या विचारांची सध्या सर्वत्र चलती
आहे त्यामुळे सरकार जे चांगले काम करत आहे त्याकडे लक्ष दिले जात नाहीच पण जिथे ते
चुका करतंय तिथेही दुर्लक्ष होतंय! ‘या सरकारने १० वर्षांत काहीच केले नाही’ हे
वाक्य टाळ्यांसाठी ठीकच ! पण मग उलटा प्रश्न विचारावासा वाटतो की जनता तिसऱ्यांदा
निवडून का देतेय ? ह्या प्रश्नावर पण ह्या लोकांचे उत्तर तयार असते – कुठे निवडून
देतात ? अजूनही फक्त सरासरी ३५% लोक भाजपला मतदान करतात म्हणजे अजूनही ६५% जनता
विरोधातच आहे ! हे इतकं भंपक आणि तकलादू समर्थन आहे की ह्यावर हसावं की रडावं तेच
कळत नाही. कारण कॉंग्रेसला सर्वाधिक ४१४ जागा जेव्हा इंदिरा गांधींच्या हत्येनंतर
देशभरात एक सहानुभूतीची लाट असल्यामुळे मिळाल्या होत्या तेव्हा मतांची टक्केवारी
४९% होती म्हणजे असं म्हणायचं का की ५१% लोक कॉंग्रेसच्या विरोधातच होते तेव्हाही
? २००४ आणि २००९ साली हेच आकडे २७% आणि २९% होते. म्हणजे तेव्हाही ७०% जास्त लोक
कॉंग्रेसच्या विरोधातच होते आणि त्यांनी तसेच मतदान केले. मग भाजप पुष्कळ चांगल्या
परिस्थितीत आहे असे मानायचे का ? मला एक कळत नाही जेव्हा इतकं तद्दन तर्कविसंगत
विधान हे विद्वान एखाद्या मुलाखतीमध्ये करतात तेव्हा मुलाखत घेणारे प्रतिप्रश्न का
करत नाहीत ?
नरेंद्र
मोदी कोणतीही लोकशाही मुल्ये आणि तत्त्व पाळत नाहीत असा अजून एक आरोप ही मंडळी
लावतात. पत्रकार परिषद घेत नाहीत, सर्व पक्षीय बैठकांना गैरहजर असतात, त्यांच्या
सरकारच्या कामकाजात पारदर्शकता नाही, संसद सत्र चालू असताना ते संसदेत नसतात आणि
त्यांचा चर्चांमध्ये सहभाग पण नसतो. आता ह्यांतील बहुतांश मुद्द्यांमध्ये तथ्य
आहे. पत्रकार परिषद न घेणे हे मोदींनी स्वतःवर बंधन घालून घेतले आहे. विशेषतः
गुजरात दंगली (२००२) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विशेष चौकशी समिती नेमली
त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सामोरे जाणे जवळ जवळ बंद केले. कारण अजूनही पत्रकार
गुजरात दंगलीतून बाहेर आलेच नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त
केलेले असूनही पत्रकार, डावे विचारवंत, लेखक, तथाकथित मानवी हक्कांचे पुरस्कर्ते
मोदींकडे पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहतात. त्यात २०१४ पासून द्वेषमूलक भावनेची भर
पडली आहे. जवळपास १२-१३ वर्षे सर्व सरकारी यंत्रणांचा वापर, साम-दाम-दंड-भेद नीतीचा
अवलंब, एस.आय.टी कडून तब्बल ९ तास चौकशी, विविध न्यायालयांचे ताशेरे, माध्यमांचा
ससेमिरा, मौत का सौदागर सारखी दूषणे ह्या सगळ्यांचा कॉंग्रेसने वापर करून पाहिला
पण मोदींना कोणत्याही गुन्ह्यात अडकवू शकले नाहीत. ही बोच कॉंग्रेसला आणि विशेष
करून त्यांच्या समर्थक पक्षकारांना ( हे पत्रकार
नाहीतच!) अजूनही आहे. अजूनही पत्रकार २००२ विषयी प्रश्न विचारणे सोडायला
तयार नाहीत. उद्या समजा मोदींनी माफी मागितली तर एवढी उशिरा माफी मागितली त्याचा
आता काय उपयोग किंवा माफी मागितली म्हणजे ते स्वतःला दोषी मानतात असे म्हणायला हे
कमी करणार नाहीत. दोन्ही बाजूने ढोलकी वाजवायची हे ह्या पिनोक्योंचे व्यवच्छेदक
लक्षण आहे. मग नरेंद्र मोदींनी हा पत्रकार परिषद संन्यास घेतला तर त्यांना किती
दोष द्यायचा ह्याचा आपणही विचार करायला हवा. शिवाय त्यांचे मंत्री मंडळातील सहकारी
वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन सरकारच्या निर्णयांची माहिती देत असतात,
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरेही देत असतात. अजून मोदी वेगळे काय सांगणार आहेत ?
इथे एक निरीक्षण मला हे नोंदवावेसे वाटते की ह्या पत्रकारांचा लोकांशी संपर्क
बराचसा तुटलेला दिसतो पण मोदींचा जनसंपर्क अजूनही उत्तम आहे. ‘मन की बात’ त्यांनी
एकही खंड न पाडता चालू ठेवली आहे, समाज माध्यमांवर ते सक्रिय असतात, पद्म
पुरस्कारांची निवड ह्यावरही त्यांची छाप दिसते. बाकी त्यांच्या कामकाजाची पद्धत
ह्या विषयावर जेव्हा त्यांच्याबरोबर काम करणारे प्रशासकीय अधिकारी जेव्हा काही
वर्षांनी पुस्तके लिहितील तेव्हा बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल – बऱ्या आणि वाईट
दोन्ही ! तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही ! एक विशेष त्यांच्या कामांबद्दल
सांगायचे झाले तर त्यांनी अशी दृश्यात्मक आणि मुलभूत कामे हातात घेतली आणि ती
पूर्ण करून दाखवली जी जनतेला प्रत्यक्ष दिसतील आणि प्रभाव टाकतील. म्हणजे रस्ते, मेट्रो, रेल्वेचे आधुनिकीकरण,
प्रत्येकाला घर,
शौचालय, पाणी, बँकेत खाते, वीज जोडणी, उज्ज्वला योजने मार्फत एल.पी.जी सिलेंडर वगैरे
! म्हणूनच प्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता २०१९ नंतर मोदींनी अधिक जागा जिंकल्यानंतर
एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते,
“आम्हाला जमिनीवर मोदींनी केलेले बदल दिसत होते पण आम्ही ते कबूल करायला तयार
नव्हतो. डोळ्यांसमोर दिसत असतानाही आम्ही ते पाहायला आणि स्वीकारायला तयार नव्हतो.
आता आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे!”. तर शेखर गुप्ता निदान २०१९ ला का असेना
प्रामाणिकपणे अशी कबुली देत होते पण त्यांचेच डाव्या विचारसरणीशी प्रामाणिक असलेले
व्यवसाय बंधू, मित्र , सहकारी अजून तिथेच घुटमळत बसले आहेत. कायदे तयार करताना
विरोधकांशी किंवा संबंधित लोकांशी मोदी चर्चा, सल्ला-मसलत करत नाहीत हा आक्षेप खरा
आहे. ( उदा. कृषी कायदे, भू-संपादन किंवा जमीन अधिग्रहण कायदा ) त्यावर सरकारचे
उत्तर तर्कसंगत वाटते – आत्तापर्यंत बऱ्याच समितींचे ह्या प्रश्नांवर अहवाल उपलब्ध
असताना त्यांचाच अभ्यास करून हे कायदे तयार केले होते. शिवाय संसदेत चर्चेला वेळ
देऊन, सर्वंकष चर्चा करून हे पारित झाले होते. हे दोन्ही कायदे मागे घेण्याची
नामुष्की सरकारवर आली. ही चूक ह्या कार्यकाळात सरकार सुधारताना दिसतेय. आता सरकार
स्वतः कुठलेही नवीन विधेयक आपणहून संसदेच्या संयुक्त समितीकडे किंवा स्थायी
समितीकडे पाठवताना दिसतेय. जागा कमी आल्यामुळे असेल किंवा आघाडी सरकार चालवायचे
आहे म्हणूनही असू शकते. बाकी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकांना
हजर राहणे आणि अधिवेशन चालू असताना संसदेत जास्त वेळ उपस्थिती नोंदवणे,
चर्चांमध्ये सहभाग घेणे हे करायला हवे असे माझे मत आहे. पण एकूण सारांश पाहता
सरकार कोणते निर्णय घेतंय, कोणत्या योजना राबवतंय हे जनतेपर्यंत पोहोचतंय ह्या
मताचा मी आहे. त्यामुळे हे सरकार आल्यापासून म्हणजे २०१४ पासून सर्व लोकशाही
तत्त्वे, मुल्ये पायदळी तुडवते आहे ही जरा अतिशयोक्तीच म्हणायला हवी. अशी
अतिशयोक्ती नरेंद्र मोदींचा प्रत्येक निर्णय मास्टरस्ट्रोक असतो आणि ते कधीच चुकत
नाहीत अशी बाजू घेणारे पत्रकार आणि माध्यमे पण करत असतात. त्यांचाही इथे उल्लेख
करायला हवा कारण त्यांनीही सारासार विवेक बाजूला ठेवलेला दिसतो. पहिली गोष्ट
नेत्यांना देवत्व देणे आपण आता थांबवूया मग तो नेता कोणीही असो. हा मोह
भल्या-भल्यांना आवरता येत नाही. ती आपल्यासारखीच माणसे आहे आणि ती देखील चुकू
शकतात हे आधी आपण स्वीकारायला हवे. तर ज्यांच्या विवेकाचा लंबक अगदी उजवीकडे किंवा
टोकाच्या डावीकडे गेलाय असे दोन्ही गट सारखेच दोषी आहेत. पण ह्या दोन्ही गटांची
किंवा टोळ्यांची समाज माध्यमांवर चालणारी भांडणे म्हणजे आणीबाणी असे कसे म्हणता
येईल किंवा मानता येईल ?
अजून
एक सार्वत्रिक आणि २०१४ पासून सार्वकालिक आरोप असा आहे की सर्व स्वायत्त संस्था म्हणजे
निवडणूक आयोग, न्यायपालिका, सी.बी.आय, ईडी सरकारने स्वतःच्या खिशात घातली आहेत. विशेषतः
निवडणूक आयुक्त सरकारच्या सल्ल्यानुसारच काम करतात, निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर
करतात इत्यादी इत्यादी ! विरोधाभास हा की कॉंग्रेसच्या काळापासून त्या त्या
सरकारच्या आणि विशेषतः पंतप्रधानांच्या मर्जीनुसारच निवडणूक आयुक्तांची नेमणूक होत
असे. संपूर्णपणे एकतर्फी निवड प्रक्रिया होती. टी. एन शेषन हे निवडणूक आयुक्त
म्हणून डोईजड होऊ लागले तेव्हा आधी राजीव गांधी यांनी एकल निवडणूक आयोगाला त्रि-सदस्यीय
केले. पुढे पी. व्ही. नरसिंहराव यांनी हीच रचना कायम तर केलीच पण त्यात अजून एक
पाचर मारून ठेवली की मुख्य निवडणूक आयुक्तांचा विशेष नकाराधिकार (veto power) काढून
टाकत तिन्ही आयुक्तांना समान अधिकार दिले. ह्या शिवाय निर्णय बहुमताने ( एकमताने
नव्हे ) घेतला जावा अशी व्यवस्था कायम केली. पण मोदी सरकार निवडणूक आयोगाच्या
कामकाजात हस्तक्षेप करते म्हणून सर्वोच्च न्यायालयात २०१५ सालीच अनुप बरनवाल ह्या
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने, ए. डी. आर ह्या सामाजिक संस्थेने, काही
निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि नागरी संस्थांच्या लोकांनी एक जनहित याचिका दाखल
केली. गेली सत्तर वर्षे ह्या विषयाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या आणि एरवी कोणत्याही
घटनेची स्वतःहून दखल घेऊन प्राधान्याने सुनावणी (suo-moto congnizance) घेणाऱ्या
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आणि त्यावर सरकारला सुनावणी
दरम्यान चांगलेच धारेवर धरत कडक ताशेरे ओढले. २ मार्च २०२३ ला निर्णय दिला की संसद
जोवर ह्या विषयी कायदा पारित करत नाही तोपर्यंत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्ष
नेता आणि मुख्य सरन्यायाधीश ह्यांची तात्पुरती समिती मुख्य आणि इतर निवडणूक
आयुक्तांची नेमणूक करेल. केंद्र सरकारने संसदेत ह्या संदर्भात कायदा पारित केला
आणि समितीमधून मुख्य सरन्यायाधीश यांना वगळून पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या
मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्रीस सदस्य म्हणून समाविष्ट केले. ह्यावर आक्षेप हा की
मुख्य सरन्यायाधीशांना का वगळले? आरोप रास्तच ! पण जिथे सर्वोच्च न्यायालय
न्यायाधीशांची निवड कॉलेजीयमच्या माध्यमातून करताना एखाद्या जिमखाना क्लब प्रमाणे
करते, केंद्र सरकारचा हस्तक्षेप त्यांना नकोसा असतो तिथे सरकारने प्रत्येक समितीत
मुख्य सरन्यायाधीशांना ठेवण्याचा उदारपणा का दाखवायचा ? सी बी आय संचालक पदाच्या
निवड समितीत मुख्य सरन्यायाधीश सदस्य असूनही बऱ्याच सी बी आय संचालकांना पदावरून
काढून टाकण्याची वेळ सरकारवर आली आहे. म्हणजे मुख्य सरन्यायाधीशांची उपस्थिती ही
प्रामाणिक आणि निस्पृह अधिकारी निवडली जाणायची हमी नव्हे ! सर्वोच्च
न्यायालायाबद्दल म्हणायचं तर एन जे ए सी, इलेक्टोरल बॉंड, निवडणूक आयुक्त निवडीच्या
प्रक्रियेवरील निर्णय, दिल्ली सरकार विरुध्द केंद्र सरकार आणि मिनरल्स केस असे
निर्णय केंद्र सरकारच्या विरोधात दिले आहेत. मग केंद्र सरकारचा दबाव कुठे आणि कसा
आहे ? ह्याच सरकारच्या विरोधात ‘आधार’ कायद्याच्या निवाड्यात विरुध्द निकाल देताना
( चार विरुद्ध एक ) माजी मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ह्यांनी निकालपत्रात
म्हटलं होतं “it is unconstitutional and a fraud on constitution.” तेव्हा
स्वायत्त संस्था सरकारच्या दबावाखाली काम करत आहे हा दावाही पुष्कळ अंशी पोकळ आणि
आधारहीन आहे. अजूनही जवळ जवळ सरकारच्या कोणत्याही निर्णय किंवा पारित केलेल्या कायद्याविरूद्ध
लोक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना दिसतात. म्हणजे निर्णय केवळ मोदी
सरकारने घेतले आहेत म्हणून विरोधासाठी विरोध करताना हा वर्ग दिसतोय आणि तोही
टोकाचा विरोध ! सरदार सरोवर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन गुजरात
सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर तेव्हा मेधा पाटकरांची बाजू न्याय्य आहे असे
मानून मोदींवर टीका करणार्यांनी मोदींची माफी मागितली पाहिजे या आशयाचा लेख पत्रकार
स्वामिनाथन ऐय्यर यांनी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहिला होता. त्यामुळे सत्य आणि
सत्याचा आभास ह्या मधला फरक आपण समजून घेतला पाहिजे.
शेवटी
राहून राहून एक आश्चर्य वाटते की ज्या पद्धतीने ही तथाकथित स्वघोषित विचारवंत
मंडळी राहुल गांधींचा उदो उदो करतात .. ते कशासाठी ? राहुल गांधी प्रामाणिक आहेत, निरागस आहेत आणि बोलण्यात तर इतकी
मुग्धता आहे की आपण काय बोलतोय हे त्यांचे त्यांना पण कळत नसावे. मी सावरकरांसारखी
माफी मागणार नाही असे म्हणणारे राहुल गांधी राफेलच्या केस मध्ये वकीलामार्फत
सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागतात आणि ह्या त्यांच्या कचखाऊ धोरणाबद्दल
कोणी काही बोलत नाही. स्वर्गीय श्री अरुण जेटली संसदेत राफेलच्या चर्चेवर उत्तर
देताना राहुल गांधींविषयी म्हणाले होते, “राहुल गांधी is an expert without knowledge.” आणि हेच राहुल गांधी आत्तापर्यंत
सिद्ध करत आले आहेत. ते लोकसभेत विरोधी पक्ष नेते झाल्यापासून मी त्यांच्या फक्त
एका अभ्यासपूर्ण भाषणाची वाट पाहतोय .. आणि अजून वाट पाहतोच आहे. वर्ष उलटले हे
नवीन मोदी सरकार येऊन ! अर्थसंकल्प, नवीन वक़्फ़ कायदा किंवा अगदी कोणताही विषय
त्यांनी निवडावा आणि एक अभ्यासपूर्ण भाषण करावं! संसदेत नाही तर बाहेर कुठेही
करावं! ज्या विरोधी पक्ष नेतेपदाला अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि बऱ्याच अजून
नेत्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची परंपरा आहे त्या पदास राहुल गांधी यांनी योग्य तो
न्याय द्यावा असे मला मनापासून वाटते. पण मुळात त्यांना अभ्यासाचेच वावडे आहे असे
जाणवते. खो-खो खेळावा तसे ते एका पाठोपाठ एक मुद्दा उठवतात पण त्यातील एकाचाही
शेवटपर्यंत पाठपुरावा करत नाहीत आणि धसास लावणे तर दूरच ! पण तरीही ह्या ‘आधुनिक
पिनोक्योंना’ त्यांच्यात भावी पंतप्रधान दिसत असतील तर आपण काय म्हणणार ? एकीकडे
व्यक्तिकेंद्रित राजकारण करतात म्हणून मोदींवर आक्षेप पण दुसरीकडे राहुल गांधीची
मात्र तळी उचलताना कसलाही विधी निषेध नाही – हेच दुटप्पी धोरण ह्यांचे आजवर राहिलं
आहे. सरकारचे असे अनेक निर्णय आहेत ज्यांची चिकित्सा झाली पाहिजे उदाहरणार्थ जी एस
टी, कामगार कायद्याची रखडलेली अंमलबजावणी ! त्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणे ,
नवीन पर्याय सुचवणे ह्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पण तरीही फक्त मोदींना नावे
ठेवून आणि वारंवार अघोषित आणीबाणीचा बागुलबुवा उभा करून ही सगळी ‘पिनोक्यो’ मंडळी
आपली नाके अजून किती मोठी करून घेणार आहेत ते कळत नाही !
(पूर्व प्रसिध्दी - किस्त्रीम दिवाळी अंक २०२५ )
समाप्त