रविवार, १० एप्रिल, २०२२

ग्रीन बुक : माणूस बदलू शकतो याची साक्ष पटवणारा सिनेमा

खूप दिवसांपासून एक सिनेमा पाहायचा होता - ग्रीन बुक! भारतात - म्हणजे पुण्यात असताना कोणत्याही वाहिनीवर तो लागला नाही पण स्वीडनला आलो आणि नेटफ्लिक्स वर "ग्रीन बुक ... coming soon" असं दिसलं मग ठरवलंच, हा सिनेमा आला की पाहायचाच.ऑस्कर विजेता चित्रपट आहे किंवा वर्णद्वेषाविषयी काही एक सांगू पाहणारा सिनेमा आहे म्हणून उत्सुकता होती असं नव्हे पण विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा फक्त दोन पात्रांविषयी आहे हे वाचल्यावर मला उत्सुकता ही की लिहिणाऱ्यांनी अशी काय कथा आणि संवाद लिहिलेत की पाहणाऱ्यांची तंद्री लागावी ? जेव्हा पुढे कळलं की सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे तेव्हा ही उत्सुकता अजूनच वाढली. अर्थात मी काही चित्रपट समीक्षक नाहीए त्यामुळे मी "ग्रीन बुक" ची समीक्षा वगैरे लिहिणार नाहीए! पण मला त्या सिनेमातलं जे भावलं, पटलं तेच इथे लिहिणार आहे.हा रसास्वाद आहे असं म्हणा हवं तर! 

ग्रीन बुक नावावरून हा सिनेमा ग्लोबल वार्मिंग म्हणजे - जागतिक तापमान वाढ या विषयावर आहे असं वाटण्याची शक्यता असू शकते पण तसं अजिबात नाहीए! चित्रपट १९६० च्या दशकातील अमेरिकेच्या वर्णद्वेषी समाजातील गोऱ्या आणि काळ्या माणसांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीचा आहे. खरं तर खूप गंभीर विषय - पण लेखक-दिग्दर्शक या द्वयीनीं तो मांडलाय किंचित नर्म-विनोदी पद्धतीने! दोनच प्रमुख पात्रं - एक गोरा आणि एक काळा - जणू बुद्धिबळाच्या पटावरील दोन राजे! पण या डावात हे दोघेही जिंकतात - आणि प्रेक्षकही ! शह-काटशह आहेत पण ते संवादातून दोघेही एकमेकांवर करतात. पण या एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या त्यांना घायाळ करत नाहीत तर उलट त्यांचे अहंगंड, दुराग्रह, छोट्या छोट्या सवयींबद्दलचे अट्टाहास आणि त्यातून येणारा अहंकार , "मी"पणा हे सगळे पापुद्रे हळूहळू गळून पडतात आणि सूत जमून जातं ... गाठी पक्क्या बसतात - कायमच्या! 

यांत जे वरचढ पात्र आहे ते आहे - डॉ.डॉन शर्ली - जो आफ्रो-अमेरिकन पियानिस्ट आहे.अत्यंत उत्कृष्ठ पियानो वाजवत असतो आणि आर्थिक दृष्ट्यादेखील समृद्ध असतो. त्याला अमेरिकेच्या दक्षिण भागांत आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन महिने फिरायचे असते. म्हणून एका ड्रायव्हरच्या - वाहन चालकाच्या - शोधात तो असतो. दुसरं पात्रं आहे - जे खरोखर मेषपात्र आहे - ते मात्र मजेदार आहे. वर्णन करायचं झालं तर दणदणीत वळू असतो तसं ते मस्तीखोर पात्र आहे - टोनी लीप त्याचं नाव! इटालियन-अमेरिकन बाऊन्सर म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर गुद्देखोर,उसळचेंडू किंवा उसळखोर गृहस्थ आहे. म्हणजे दारू पिऊन गोंधळ करणाऱ्यांना चोप देत बारच्या बाहेर घालवण्याचं त्याचं काम! त्याचा बार आता बंद होणार आहे - त्यामुळे घर चालवायला काही तरी काम शोधलं पाहिजे नाही तर बायको-मुलांना खाऊ काय घालणार? पण गडी तसा हुशार आणि चाणाक्ष आहे, ज्यांस इंग्रजीमध्ये स्ट्रीट-स्मार्ट म्हणतात तसा! कुठून पैसे मिळणार अशी भनक जरी लागली तरी गडी तिथे हजर! भय,काळजी,भविष्य वगैरे क्षुद्र गोष्टींना फाट्यावर मारणारा कारण त्याच्या बापाने त्याला उपदेश दिलाय जो त्याने गुरूमंत्रा सारखा अंगी बाणवलाय - जगायचं तर १०० टक्के जग, हसायचं असेल तर दिलखुलास हस, काम करताना फक्त कामाकडे लक्ष असू दे, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे - जे काही करशील ते तुझ्या आयुष्यातील शेवटचं काम आहे असं समजून कर - थोडक्यात वर्तमानात राहा - मागेही वळून पाहून नको आणि भविष्याचा पण फार विचार करू नको ! .. एन्जॉय! पठ्ठ्या आहे पण तसाच! क्षुधा (म्हणजे भूक) तर एवढी जबरदस्त आहे की हा प्राणी सतत चरतच असतोच पण ५० डॉलर्सच्या पैजेखातर गडी २६ बर्गर खाऊन तृप्तीची ढेकर देतो. त्याचे ते असे सततचे चरणे बघून आपल्या तोंडाला पाणी सुटत राहते हे पण तितकंच खरं! त्याची बेफिकीर वृत्ती तर हेवा वाटावा अशीच आहे. या दोन्ही पात्रांचे त्यांचे स्वतःचे असे नियम, वागण्या -बोलण्याच्या रीती, खाण्या-पिण्याच्या पध्दती, पूर्वग्रह आणि दृष्टिकोन आहेत.तरीही फक्त दोन महिन्यांच्या प्रवासात दोघे एकमेकांमुळे अंतर्बाह्य कसे बदलतात ते या सिनेमात प्रभावीपणे दाखवलं आहे. 

मला काही संदर्भ आठवतात या निमित्ताने - पु .ल एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते - "प्रत्येक माणूस हे एक वेगळं जग आहे. निसर्गाला आपली कॉपी करायची हौस नाहीए! म्हणून प्रत्येक माणूस हा वेगळा आहे." अजून एका ठिकाणी ते म्हणतात - "कालचा माणूस, आजचा माणूस किंवा उद्याचा माणूस असं काही नसतं, माणूस नावाची एक निखळ गोष्ट आहे जी सगळे भाव घेऊन जगत आणि वावरत असते." या दोन्हींचा प्रत्यय आपल्याला "ग्रीन बुक" बघताना येत राहतो. तर या टोनीला श्यामवर्णी लोकांविषयी फारशी आपुलकी वगैरे नसते - या बाबतीत तो त्याच्या बायकोच्या एकदम विरुद्ध असतो. पण नेमकं ह्यालाच त्याचा बार-मालक डॉ. शर्लीकडे ड्रायवरच्या मुलाखतीसाठी पाठवतो. पैश्यांची भ्रांत असतेच म्हणून दोन महिन्यांसाठी का होईना म्हणून हा पठ्ठ्या नाईलाजाने मुलाखतीसाठी जातो. त्याच्या डोक्यात असतं की एका डॉक्टरला ड्रायवरची गरज आहे पण मुलाखती दरम्यान डॉ शर्ली सांगतो की तो एक निष्णात पियानिस्ट आहे डॉक्टर नाही! हा मुलाखतीचा प्रसंग खरोखर पाहण्यासारखा आहे. डॉ.शर्लीची अदबशीर, शांत स्वरांत ठराविक लयीत बोलायची पध्दत माहेरशाला अली या नटाने अप्रतिम रित्या सादर केली आहे.एक गोष्ट मला खटकली - डॉ शर्ली दिवाणखाण्यात येऊन बसतो एका प्रमुखाची किंवा राजाची वाटावी अशा मोठ्या खुर्चीवर जी दिवाणखाण्यात ठेवलेल्या इतर खुर्च्यांपेक्षा किंचित उंचीवर ठेवलेली! इथे प्रथम अहंकाराचे दर्शन होतं - मला प्रश्न पडला की डॉ शर्लीचा हा मिजास कशासाठी? हे दाखवण्यासाठी की मी माझ्या कलेच्या जोरावर हे स्थान मिळवलं आहे आणि बाहेरचं जग,समाज मला माझ्या वर्णामुळे मला एक व्यक्ती म्हणून किंवा कलावंत म्हणून जो सन्मान मिळायला हवा तो जर देत नसेल तर मी निदान माझ्या घरात तरी स्वतःला देणार! इथे मला विजय तेंडुलकर यांच्या "कन्यादान" नाटकाच्या सूत्राची आठवण होते - पिळवणूक झालेल्यांना संधी मिळाली की तेही पिळवणूकच करतात.अर्थात डॉ.शर्ली आपला आत्मसम्मान किती जपतो याची प्रचिती या पहिल्या प्रसंगापासून प्रेक्षकांना यावी म्हणून लेखक-दिग्दर्शकाने हे योजिले असावे! पण ही प्रचिती वारंवार येत राहते. 

डॉ.शर्ली टोनीला स्पष्ट सांगतो कि त्याला फक्त ड्रायवर नकोय तर एक व्यक्तिगत सहकारी हवाय जो त्याची राहायची व्यवस्था बघेल, त्याचे कपडे इस्त्री करेल, बूट पॉलीश करेल, त्याला हवा तसा पियानो आयोजकांनी तयार ठेवला आहे की नाही? हे देखील तपासून घेईल आणि विशेष म्हणजे स्वतःही टापटीप राहील. 
पण टोनीला अशा चांगल्या (? ) सवयी कुठे असतात? 
तो सरळ सांगतो - "मी काही बटलर नाहीए! मी फक्त ड्रायविंग करेन .. तुला तुझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवण्याची माझी जबाबदारी! ह्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही!" इथेच वाटाघाटी फिस्कटतात - हे म्हणजे आपल्या भारत-पाकिस्तान चर्चेसारखं! 
त्या बरोबरच आणखीन दोन महत्वाचे प्रश्न डॉ.शार्ली टोनीला विचारतो,"एका काळ्या माणसाचा ड्रायवर व्हायला तुझी काही हरकत आहे का?" मनात पूर्वग्रह असूनही केवळ चांगले पैसे मिळणार म्हणून किंवा काही दुसरा पर्याय नसल्यामुळे "मला काही प्रॉब्लेम नाही!" असं टोनी सांगतो. 
पुढे डॉ.शर्ली विचारतो - "दोन महिने माझा दौरा असणार आहे आणि त्याच दरम्यान ख्रिसमस आहे तर तुझ्या बायकोस हे चालणार आहे का ?" 

टोनी म्हणतो - "मी तिला समजावून सांगेन पण खरंच ख्रिसमस पर्यंत आपल्याला येणं जमणार नाही का?" 
डॉ.शर्ली म्हणतो - "माहीत नाही .. बघू!" पण एकूणच डॉ . शर्लीच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या माणसाला मुलाखतीसाठी बोलावलं आहे.म्हणून तो टोनीची बोळवण करतो - "धन्यवाद इथे आल्याबद्दल ! दोन जणांनी तुझंच नाव सुचवलं पण माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत." एवढं सगळं होऊनही टोनीच्या पत्नीची रीतसर परवानगी घेऊन डॉ.शर्ली टोनीलाच ड्रायवर म्हणून निवडतो आणि आपल्याबरोबर प्रवासास घेऊन जातो..... त्यांच्यातील बदलाला आणि प्रवासाला एकदमच सुरूवात होते. 

हा प्रवास चित्रपटातच पाहण्यासारखा आहे. मी उगाच इथे शब्दांचे खेळ करून चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपवू इच्छित नाही. डॉ.शर्लीचा आणि टोनीचा दोन टोकांपासून सुरु होणारा प्रवास ख्रिसमसच्या दिवशी मैत्रीचे घट्ट बंध तयार करूनच संपतो .... दोघेही जोपर्यंत हयात होते तोपर्यंत हे बंध सुटले नाहीत उलट अधिकाधिक घट्ट होत गेले. 

एका महालासारख्या घरात एकटा राहणारा डॉ.शर्ली! त्याच्याच समाजात केवळ तो चारचौघांसारखा सामान्य नाही म्हणून कोणी त्याला आपला मानत नाहीत हे त्याचं शल्य! उलट उच्चवर्णीय, श्वेतवर्णी लोक केवळ त्यांची "सांस्कृतिक उंची" (?) प्रदर्शित करता यावी म्हणून या उत्कृष्ठ पियानिस्टला कार्यक्रम करायला निमंत्रण देतात पण कार्यक्रम संपल्यावर त्यास कृष्णवर्णीय असल्याची आठवण देखील करून देतात, ही टोचणी त्याला आहे. हे सगळं एका प्रसंगी उद्वेगाने डॉ.शर्लीच्या तोंडून बाहेर पडते तेव्हा टोनीला लक्षात येते कि शर्ली काय काय आणि कसं सहन करतोय. त्याचा कृष्णवर्णीयांविषयी असलेला पूर्वग्रह गळून पडतो. शेवटी सहवास लाभल्याशिवाय तुम्हांला माणूस कळत नाही हेच खरं! माणूस बदलू शकतो हे पण हा चित्रपट पटवून देतो. या चित्रपटाचं नाव "ग्रीन बुक" का ठेवलं आहे ते देखील तुम्हांला चित्रपट पाहताना कळेल. 

तर तुम्ही पण "ग्रीन बुक" चा हा अंतर्मुख करणारा प्रवास नक्की अनुभवा ...... या प्रवासाची वेगळीच मजा आहे जी बराच काळ मनात रुंजी घालत राहते..... निदान मी तरी माझ्यापुरतं ते अनुभवतोय! 

-- भालचंद्र देशमुख 
 १० एप्रिल २०२२

२ टिप्पण्या:

Rupali म्हणाले...

Khupach chan

Kasturi म्हणाले...

उत्तम लिहिले आहे. लिखाण चालू ठेवावे.

'तिची' ठराविक वेळ

आजकाल "मला  माझी स्पेसच मिळत नाही" किंवा "आमच्या घरात मला प्रायव्हसीच मिळत नाही." अशी वाक्यं आपल्याला आपल्याच मित्र-मैत्...