रविवार, २० मार्च, २०१६

करून करून काळजी ….

"अं … मला कधी स्वयंपाक करायची गरजच नाही पडली. बालवाडीपासून ते इंजिनिअरींगपर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. त्यामुळे बाहेर राहण्याचा किंवा स्वतः करून  खाण्याचा प्रसंग फारसा कधी आलाच नाही. आई मागे लागायची की थोडा स्वयंपाक शिकून घे पण मीच कंटाळा करायचे म्हणून मग तिनेही जास्त आग्रह केला नाही .  " - माझी मैत्रीण मधुरा मला सांगत होती. माझ्याच पिढीची प्रतिनिधी - अविवाहित ! दुसरं उदाहरण माझ्या एका विवाहित मैत्रिणीच - शर्वरीचं "मी आणि सारंग दोघेही नोकरी करतो. सारंगला डबा हवा असतो आणि माझी धावपळ होऊ नये म्हणून माझ्या सासूबाई त्याच्या डब्याबरोबर माझा पण डबा करतात . सो स्वीट ऑफ हर !" माझ्या पिढीची - तिशीच्या आत-बाहेर असलेल्या मुला-मुलींची पिढीची - ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं !  स्वयंपाकाचा मुद्दा सोडून दुसऱ्या एका त्याहून महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलण्यासाठी हा सगळा लिहिण्याचा आटापिटा !

तो मुद्दा आहे वरवर न दिसणारा पण प्रकर्षाने जाणवणारा आणि तरीही दुर्लक्षित राहिलेला - आमच्या आई-बाबांच्या पिढीचा विचार ! तो खरंच महत्वाचा आहे पण एका वेगळ्या अर्थाने ! मी हे म्हणत नाही की माझ्या पिढीतील मुलं-मुली आप-आपल्या आई वडिलांची काळजी घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु नुसती आर्थिक साहाय्य करणं म्हणजे लक्ष देणं किंवा काळजी करणं नव्हे ! त्यांच्या पिढीची जडण-घडण सर्वार्थाने वेगळ्या रीतीने झालेली आहे. बहुतेकांचे जन्म स्वातंत्र्यप्राप्ती नंतर झालेले असूनही घरात मात्र कमालीची बंधने होतीच. एवढंच नव्हे तर ही बंधने पाळण्याची पण सक्ती होती. बरेच जण एकत्र कुटुंबात वाढलेले असल्याने त्यांच्या आई-वडिलांना प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्य नसायचे. आजच्या सारखे पालक त्यावेळेस 'सजग' नसायचे ( आज जरा अति-सजगता जाणवतेय पालकांमध्ये ही गोष्ट निराळी ). पालक हा त्यावेळेस फक्त 'भाजी'पुरता मर्यादित होता. पुष्कळ जण तर त्यांच्या आजोळी किंवा आजी-आजोबांकडे शिकायला असायचे आणि त्यांची त्यांच्या आई-वडिलांशी भेट क्वचितच होत असे. अशा परिस्थितीत स्वतःची कामे स्वतः करत, लहान भावंडांना सांभाळत घरातली कामे , शेतातली कामे करत शिक्षण पूर्ण करून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले ! कधी वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडून त्यांचा हा झगडा जरूर ऐका ( त्यासाठी स्मार्ट फोन कदाचित बाजूला ठेवावा लागेल :)) आणि हा पण विचार करा की आम्हांला असा कधी झगडा करावा लागला का ?काही अपवाद वगळले तर बहुतेकांचं उत्तर 'नाही' असंच असेल. वडिलधाऱ्यांचा हुकूम मोडण्याची प्राज्ञा नव्हती. त्यामुळे स्वतःची कामं तर करावीच लागत पण मोठ्यांची कामेही निमुटपणे करावी लागत. त्यातच त्याचं बालपण कधी निघून गेलं त्यांना कळलंच नाही. काही जणांची मुख्यतः स्त्रियांची पुढे शिकण्याची इच्छा असतानाही त्यावेळच्या समाजपरिस्थितीमुळ, शिक्षणाविषयी पुरेसे गांभीर्य नसल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणं अर्धवट सोडावं लागलं. तारुण्यात पदार्पण केल्या-केल्या घरची जबाबदारी , लगेच लग्न आणि संसार !

त्यावेळेस हौसे-मौजेचे आजच्या इतके पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे क्वचित एखादा सिनेमा, नाटक किंवा फिरणे ( ते पण शक्यतो कुलदैवताच्या दर्शनाला किंवा देवदर्शनाच्या ठिकाणी ) एवढीच काय ती मौजेची व्याख्या! आपल्याला बालपणी किंवा तारुण्यात जे उपभोगायला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळायलाच हवं या एका इच्छेपोटी ह्या पिढीने किती खस्ता काढल्या त्याची काही मोजदादच शक्य नाही ! मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या हौसे-मौजेसाठी, चैनीसाठी काहिही कमी पडू दिलं नाही. डबे करण्यापासून ते कॉलेजच्या अडमिशनपर्यंत दोघांपैकी कोणी न कोणी सोबतीला होतच आणि आता त्यांची मुलं ( म्हणजे माझी पिढी ) लग्न करून संसाराला लागल्यानंतरही त्यांच्या मदतीचा किंवा ठेचकाळ्यावर आधाराचा हात हजर आहेच. आपण संसाराला लागल्यानंतर जसं जमेल तसं काटकसर करत , धडपडत , झाल्या चुकांमधून शिकत-सावरत दिवस काढले ते मुलांच्या वाट्याला शक्यतो येऊ नये एवढीच त्यांची माफक इच्छा आहे. त्यामुळे झालंय काय ह्या उतारवयात त्यांना जो मोकळेपणा मिळायला हवा तो मिळत नाही. त्यातही सगळ्यात जास्त फरफट होत असेल तर आयांची ! आमच्या पिढीतल्या बहुतेक कुटुंबात नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे आहेत. सकाळी उठून डबे देण्याचं काम असो वा मुलांचा सांभाळ करणं असो लागेल ते सहकार्य करायला आया आपणहून तयार असतात ! बहुतेक आपल्याला कधी सासरच्या दबावामुळे नवऱ्याच्या अनिच्छेमुळे  किंवा मुलांच्या जबाबदारीमुळे नोकरी करायला मिळाली नाही … अगदी इच्छा असूनही तसं आपल्या सुनेच्या किंवा मुलीच्या बाबतीत घडू नये असं त्यांना वाटत असावं ! बरं हल्ली काही अपवाद वगळता 'सासुरवास' असा प्रकार फार राहिला नाही. त्यामुळे हल्लीच्या मुलींना तो पण त्रास नाही. त्यांना बऱ्यापैकी मोकळेपणा आहे अगदी कपडे घालण्यापासून ते सणा-सुदीच्या दिवशीही बाहेर जेवण्याचा ! हल्ली केळवणे हॉटेल मधेच जास्त होताना दिसतात … पूर्वीसारखं घरी बोलावून समारंभी घाट घालणं फारसं पाहायला मिळत नाही. शनिवार- रविवार हॉटेल मध्ये आजकाल रांगा लावाव्या लागतात ह्यातच सगळं आलं!... पण आई-बाबांचं काय ?

अजूनही आयांची स्वयंपाक घरातून सुटका नाही. का ? त्यांनी कधी कुरकुर केली नाही …. आणि करणारही नाहीत. पण त्यांनी कुरकुर केल्यानंतरच आपल्याला ते कळायला हवं का ?त्यांना येत असलेला थकवा आपल्याला का जाणवत नाही ? त्यांना त्यांच्या छंदासाठी म्हणा, काही राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी किंवा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ आणि अवकाश हवा असेल हे पण आमच्या लक्षात येत नाही का ? आम्हीच इतके हतबल झालो आहोत की आमच्या समस्यांपुढे ह्या गोष्टी दुय्यम वाटतात आम्हाला ! आमच्या पिढीची लग्नं होऊनही आई-बाबांच्या आयुष्यात फारसा फरक पडलाय असं मला वाटत नाही. व.पुंची - 'जनरेशन गप ' नावाची एक कथा आहे. त्यात त्यांची एक बालमैत्रीण त्यांना समजावणीच्या सुरात सांगत असते "अरे माझ्या लहानपणी मी माझ्या आई-वडिलांच्या गाद्या काढायचे आणि आता मी माझ्या मुलींच्या गाद्या काढते. तर तुझी आणि माझी पिढी ही गाद्या काढणार्यांचीच आहे !"मला सध्याची परिस्थिती बघता हे वाक्य तंतोतंत लागू पडल्याचं जाणवतंय ! अंतर्मुख करायला लावतं ! मला कधी कधी वाटतं की आपण त्यांना विचारतो कमी आणि गृहीतच जास्त धरतो. परदेशात असलेल्या मुलीचं किंवा सुनेचं बाळंतपण असेल किंवा सेकंड होम साठी पैसे कमी पडत असतील - आई-बाबा ( दोघांपैकी कोणाचेही ) सेवेला हजर ! अविश्रांतपणे फक्त मुलांसाठीच लागेल ते किंवा पडेल ते काम करणारे आई-वडील अजून कुठेही शोधून सापडणार नाहीत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना प्रवाहात मोकळं सोडून दिलं …… पडा-धडपडा आणि सावरा स्वतःचं स्वतःला ! त्यातून ते स्वतःही घडले आणि बऱ्याच जणांनी आपल्या भावंडांना पण 'घडवलं'. म्हणूनच 'आमच्या' आई-बाबांच्या पिढीत अजूनही एक विलक्षण आत्मविश्वास दिसतो. 

कधी १५-२० लोकांचा स्वयंपाक करायचा असेल की आमची तारांबळ उडते. कसं काय manage ( हा आजचा परवलीचा शब्द !) करायचं ? जमेल की नाही ? त्यावर उपाय म्हणून आम्ही बाहेरच पार्ट्या देतो. पण हेच काम आई-बाबा सहज जमवून आणतात. त्यासाठी त्यांना पर्याय शोधायची गरज पडत नाही. कामाचा उरक तर आम्हांला लाजवणारा ! ह्याच पिढीने, माझ्या मते आपल्या मुलांची 'बंडखोरी' अगदी सहज निभावून नेली. म्हणजे आमच्या पिढीत सध्या प्रेम-विवाह , आंतरजातीय विवाह ह्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेने निश्चित जास्त आहे. कारण तेवढं स्वातंत्र्य आणि मोकळेपणा हल्ली मुलगा असो वा मुलगी प्रत्येकालाच आहे. परंतु ज्या काळात आणि संस्कारात आपल्या आई-वडिलांची जडण-घडण झाली त्याचा विचार केला तर हे सगळं स्विकारणं हे एक धक्का पचवण्यासारखच असणार. त्यात परत हे सगळं स्वीकारून घरातील इतर वडिलधाऱ्या लोकांना , स्वतःच्या आई-वडिलांना , नातेवाईकांना ह्या प्रक्रियेत सामावून घेण्याचं अवघड कामही त्यांना करावं लागलं असेल. सोप्पं असेल का हे सगळं ? मुळीच नाही ! म्हणूनच आपले आई-वडीलच आपले पहिले आदर्श असायला हवेत !

आणि मग विचार येतो की खरंच आपण काय करतो त्यांच्यासाठी ? कधी आईला 'किती थकतेस तू काम करून ! ' किंवा 'किती करतेस आमच्यासाठी !' असं म्हटल्याचं आठवतंय ? किंवा वडिलांना 'किती टेन्शन घेता तुम्ही !' असं कधी म्हटलंय ? कारण आम्हांलाच आमची टेन्शन डोंगरांएवढी मोठी वाटतात. आपली मुलांनाच केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आयुष्य खर्ची केलं. त्यांना हे सगळं कोणी विचारलं नाही किंवा त्यांची दखल घेतली नाही तरी त्यांची तक्रार असणार नाही. कारण सवयच नाही तशी लहानपणापासून ! त्यांना फक्त थोडीफार अपेक्षा असेल तर आपल्याबरोबर तुटत चाललेल्या संवादाची …. आणि स्मार्ट- फोन मुळे ही दरी वाढतेच आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत थोडा सहभाग त्यांच्या बरोबर राहून घेतला तर सुसंवाद कायम राहील ! 

जुनी गोष्ट आहे - माझा एक मित्र शहरात पहिल्यांदा आई-वडिलांना सोडून एकटा राहायला आला आणि एके दिवशी त्याला कपडे धुवावे लागले …स्वतःचेच ! पुष्कळ वेळ लागला त्याला आणि थकून पण गेला तो ……. त्याला वाटलं की त्याने आज किती काम केलं ! पण नंतर क्षणभर विचार केल्यावर त्याला वाटलं मी एकदाच कपडे धुतले … ते पण माझेच तर मला माझ्या कामाचं कोण कौतुक ! आणि आई तर दररोज ह्या पेक्षा किती तरी जास्त काम करते …. अविश्रांत ! लगेच गलबलून त्याने आईला फोन लावला आणि हे सगळं सांगितलं तर त्याची आई हसून एवढंच म्हणाली की ,"बाळा , आज तू खरंच मोठा झाला आहेस !"

एक संदीप खरेची कविता आहे ज्यात एक लहान मूल आपल्या आई-बाबांना अंगाई गात झोपवतोय अशी कल्पना आहे - "करून करून काळजी माझी … करून करून लाड …दमलात तुम्हीं आई-बाबा झोपा जरा गाढ !" मला वाटतं आता आपल्या भूमिका पण बदलायची वेळ आली आहे आणि आता 'दमलात तुम्हीं आई-बाबा झोपा जरा गाढ' म्हणण्याची आपली पाळी आहे, हो ना ?
-- भालचंद्र ना. देशमुख 

३ टिप्पण्या:

trekker_nilesh म्हणाले...

सुंदर लेख लिहिला आहेस भालचंद्र. आई बाबांना गृहीत धरणे हे नक्कीच होत आहेरे.

Bhalchandra Deshmukh म्हणाले...

Dhanyawad Nilesh :)

Unknown म्हणाले...

Very true....!! Good one

'तिची' ठराविक वेळ

आजकाल "मला  माझी स्पेसच मिळत नाही" किंवा "आमच्या घरात मला प्रायव्हसीच मिळत नाही." अशी वाक्यं आपल्याला आपल्याच मित्र-मैत्...