"हा तेल नावाचा इतिहास आहे ", "एका तेलियाने", "टाटायन" सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि लोकसत्ताचे विद्यमान संपादक गिरीश कुबेर यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले "पुतिन" हे सहावे पुस्तक!
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा राजकीय प्रवास
अथ पासून इतिपर्यंत दाखवणारे हे पुस्तक!
"एका तेलियाने"ची वाचनीयता ज्याने
अनुभवली आहे त्याने जरूर आणि जरूर वाचावे असे हे पुस्तक!
गिरीश कुबेरांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि त्याचा
एकूणच जागतिक अर्थव्यवस्था यांच्यावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाचा पानोपानी प्रत्यय यावा असे हे वाचनीय, उत्कंठा वाढवणारे, खिळवून ठेवणारे
पुस्तक!
"अभ्यासोनि
प्रगटावे" हे गिरीश
कुबेरांकडून शिकण्यासारखे आहे. रशियाच्या वरकरणी
शांत, संयमी पण
पाताळयंत्री, क्रूर आणि बेरकी
असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांवर पुस्तक लिहिणे ही तशी पाहिली तर वरकरणी सोपी वाटणारी
गोष्ट कारण फार फार तर गेल्या १७-१८ वर्षांची कारकीर्द मांडायची. इथेच कुबेरांची विषयावर विलक्षण पकड पाहायला
मिळते. त्यांनी ठरवलं असतं तर ३१
डिसेंबर १९९९ च्या मध्यरात्री येल्त्सिन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पुतिन
यांची घोषणा केली तिथून पुस्तकाची सुरूवात करू शकले असते. पण त्यांना वाचकांना रशियाच्या इतिहासातील
महत्वाच्या घटनांमागील घटना सांगणे महत्वाचे वाटते. कारण वाचकांची नस त्यांना बरोबर माहीत आहे आणि म्हणूनच ते
संपूर्ण घटनाक्रम छान रंजकतेने सांगतात. अर्थात यात एक धोका होताच तो हा की रशियन इतिहास कुठपासून
सांगायचा? कारण रशियन राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध , सोव्हिएत रशियाचे
विघटन , शीत-युद्धाचा काळ असा
मोठा पट उलगडावा लागेल. त्यात सोव्हिएत
रशियाचे विघटन आणि शीत-युद्धाचे कवित्व
एरवीच जास्त चघळत सांगायची पद्धत! पण कुबेरांनी हा
धोका शिताफीने टाळला आहे. पुस्तकाची
सुरुवात अगदी झारपर्यंत मागे नेऊन केली असली तरी त्यासाठी खूप पाने खर्ची घातलेली
नाहीत. पुतिन आधीच्या
राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द देखील त्यांनी किंचित विस्तारात लिहिली असली तरी
आवश्यक ती पार्श्वभूमी मनात तयार करायला त्या मदतच करतात. लेनिन पासून
बोरिस येल्त्सिनपर्यंतचा आढावा घेताना पुस्तक कुठेही कंटाळवाणे होणार नाही किंवा
मूळ विषय भरकटणार नाही याची पुरेपूर काळजी कुबेरांनी घेतली आहे. तसेच कम्युनिस्ट राजवट
बोलते एक आणि करताना करते वेगळंच हे पण अधोरेखित करणाऱ्या घटना आपल्याला वाचायला
मिळतात. मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी
सोव्हिएत रशियाचे विघटनाचा निर्णय घेतला हे प्रकरण किंचित लांबले आहे पण त्यामुळे
गोर्बाचेव्ह यांची बाजूही कळायला मदत झाली आहे.
पुतिन यांच्या बालपणापासून ते रशियन राष्ट्राध्यक्षापर्यंतचा प्रवास आणि तिथून पुढे थेट रशियन गुप्तहेर संघटनांचा अमेरीकी अध्यक्षीय निवडणुकीतील तथाकथित सहभाग इथपर्यंतचा काळ आपल्याला बाकीच्या प्रकरणांत वाचायला मिळतो. काही ठिकाणी गुगलचा आधार घेऊन माहिती जशीच्या तशी उतरवलेली दिसते. अर्थात पत्रकार म्हणून कुबेरांनी त्यातील तथ्यांची शहानिशा नक्की केली असणार. पण भाषांतर करताना त्यांनी जराही फेरफार केलेली नाही याचे आश्चर्य वाटत राहते. त्यात काही गैर नाही आणि अशा जागा बोटांवर मोजण्याइतक्या कमी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे! एक मात्र नक्की की हुकूमशहा पुतिन आणि त्यांची क्रूर राजवट इथे विस्ताराने आपल्याला वाचायला मिळते. आपल्या विरोधात बोलणाऱ्या आपल्याच देशातील नागरिकांना, पत्रकारांना, गुप्तहेरांना वेचून वेचून संपवण्याचे जे अमानुष खेळ पुतिन खेळत आलेत, त्यांच्या कथा वाचताना अंगावर शहारा येतो! इतका पाताळयंत्री आणि तितकाच थंड डोक्याचा माणूस अजूनही सत्तापदावर कसा काय? याचं सतत आश्चर्य वाटत राहते. पोलोनियम सारखं जहाल किरणोत्सर्गी विष देऊन त्यांनी रशियन गुप्तचर संस्था केजीबी चा हेर अलेक्झांडर लिटविनेन्को यास अक्षरशः हाल हाल करून संपवलं. तसेच रशियाचा जागतिक दर्जाचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याने पुतिन यांना आव्हान दिले असता त्याचेही जगणे मुश्किल करून टाकले. पुतिन विरोधात सतत आवाज उठवणाऱ्या रशियन पत्रकार ऍना पॉलित्कोव्हस्काया हिची हत्या घडवण्यात आली. विशेष म्हणजे कुबेरांनी हे पुस्तक तिलाच अर्पण केले आहे. एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला पुस्तक अर्पण करणे नवे नाही पण परदेशी पत्रकाराला अर्पण करणे हे कौतिकाचे!
मी खूप आधी पुतिन कसे दहशतवाद्यांसमोर झुकत नाहीत याच्या कहाण्या वाचत आलो होतो. त्यातलीच थिएटर ओलीस ठेवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर न झुकता विषारी वायू सोडून ओलीसांची सुटका कशी केली ही सुरस कहाणी ! पुतिन सरकारने त्या वेळेस काही ओलीस त्या कारवाईत मारले गेले असताना देखील आपली पाठ थोपटून घेतली होती. त्याची खरी कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते आणि पुतिन कसे बेरकी आहेत याचाही प्रत्यय येतो. पुस्तक संपता संपता पुतिन अक्षरशः उघडे पडलेले असतात आणि आपलाही संताप होतो. अर्थात पुतिन यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी ज्या धडाक्याने आर्थिक सुधारणा राबवल्या, आयकर कमी केला वगैरे पण कुबेर मांडतात पण ते अगदी थोडक्यात! कुबेरांचा पुतिन यांच्याप्रती असलेला राग, द्वेष पुस्तकात सर्वत्र दिसत राहतो. तेव्हा असंही वाटून जातं की त्यांची चांगली बाजूही तितक्याच प्रमाणात मांडता आली असती तर हे पुस्तक पुतिन यांच्या व्यक्तिमत्वाचे विच्छेदन करणारे समतोल पुस्तक झाले असते. याचे कारण असे की पुतिन यांच्या विषयी चांगले लिहिणारी पण मंडळी आहेतच. पण कुबेरांनी पुतिन यांची काळी बाजू जास्त जोरकसपणे उघडी करून दाखवली. जाता जाता सांगावेसे वाटते ते एवढेच की, मुखपृष्ठ पण पुतिन यांचा बेरकीपणा, धूर्तपणा दाखवणारे निवडले आहे त्याबद्दल कमल शेडगेंचं विशेष अभिनंदन करायला हवे! या पुस्तकाची पहिली आवृत्ती लवकर संपली असे कुबेरांच्या ट्विटवरून कळले त्यावरून या पुस्तकाचे स्वागत वाचकांनी उत्तम केले आहे. हे त्यांची लेखन-उर्मी वाढवणारे नक्कीच ठरेल.
शेवटी एक वाचनीय, उत्कंठावर्धक पुस्तक गिरीश कुबेरांनी वाचकांना दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि शुभेच्छा !
( वृत्तपत्र पदविकेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून लिहिलेले "पुतिन" या गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरील परीक्षण )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा