५ मे, २०१३

भेट : एक राहून गेलेली आणि एक आपसूकच घडलेली !

         खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर लिहितोय …. किम्बहुना प्रयत्न करतोय लिहिण्याचा …! लिहिण्याचं थोडसं व्यायामासारखं आहे … सवय सुटली की कंटाळा वाढत जातो आणि त्यात माझ्यासारखा मुलुखाचा आळशी  असेल तर संपलच सगळं ! असो. आज दोन भेटीविषयी बोलणार आहे. 'भेट' म्हटले कि सवांद अपेक्षित असतो पण ह्या दोन्ही भेटीत त्याचा अभाव आहे. मुळात 'भेट' हाच शब्द सापेक्ष  ( relative) आहे .एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटली तर पुष्कळ गप्पा होतील पण आपलं आवडतं व्यक्तिमत्व भेटलं तर ? संवाद सोडा बोलणे सुद्धा होईल कि नाही ह्याची शाश्वती नाही … पण आपण मात्र खुश असतो आतून … आणि आपण सांगत सुटतो कि मी अमुक -अमुक व्यक्तीला भेटलो !!  दोन भेटीविषयी मी पण बोलत सुटणार आहे……
         पहिल्या भेटीचा काळ आहे बारा-तेरा वर्षापूर्वीचा !! तेंव्हा मी औरंगाबादला शिकत होतो. अशात प्रख्यात लेखक व.पु. काळे ह्यांचं कथाकथन औरंगाबादला  आहे अशी जाहिरात वर्तमानपत्रात नजरेस पडली. लगेच जाऊन मी पुढच्या रांगेचे तिकीट काढून आलो. तेंव्हा औरंगाबादला एकाच नाट्यगृह होतं. - संत एकनाथ रंगमंदिर !   घरापासून बरंच लांब! पण मी इथे बरेच  कार्यक्रम  पाहिले . अत्र्यांच्या नाटकांचा महोत्सव, पं . हृदयनाथ मंगेशकरांचा भावसरगम, पु.लं चा 'तुझे आहे तुजपाशी' , प्रभाकर पणशीकर अभिनित 'तो मी नव्हेच!' असे खूप !!  एवढंच नाही तर मी लिखित-दिग्दर्शित केलेली पहिली एकांकिकेचा प्रयोग देखील इथंच झाला होता. पण इथे प्रत्येक कार्यक्रमाची वेळ रात्रीची ९:३० !
तरीही माझ्या एम-८० वर चकरा मारत बर्याचदा एकट्याने मी इथे बरेच कार्यक्रम बघितले. …. आणि आता व.पुं. चे कथाकथन !! आता व.पुंना - आपल्या आवडत्या लेखकाला प्रत्यक्ष बघायला आणि ऐकायला मिळणार ह्या विचारानेच मी हवेतच तरंगत होतो.  शाळेत असताना जे पहिले वाचन झाले ते पु.लं च्या  पुस्तकांचे आणि नंतर व.पुं च्या  पुस्तकांचं !अधाशासारखे त्यांचे 'पार्टनर', 'सखी',' तू भ्रमात आहासी वाया', 'कर्मचारी', 'मोडेन पण वाकणार नाही' अश्या अनेक पुस्तकांचा मी फडशा पडला होता. 'पार्टनर' ची किती पारायणे केली त्याची गिनतीच नाही. ह्याबरोबरच 'बदली', 'भदे', 'पंतवैद्य', 'अनामिक' ,'मीच तुमची वहिदा', 'करंजी','जे. क़े. मालवणकर' , 'आकाश', 'पेन सलामत तो', 'हसरे दुखः' ह्या  कथाकथनाच्या कॅसेट्स मी वौकमन मध्ये घालून वारंवार ऐकत असे. शब्दांवरची त्यांची असलेली पकड , त्यांच्या fantasy ची झेप , कथेमध्ये गुंगवून ठेवण्याची किमया आणि उत्तम वक्तृत्व ह्या सगळ्यांचे माझ्यावर विलक्षण गारुड होतं! सारखं वाटायचं कि असं आपल्याला कधी लिहिता येईल का ? 'का रे भुललासी' ह्या कथासंग्रहात त्यांच्या हस्ताक्षरातलं एक पत्र आहे. इतकं सुंदर हस्ताक्षर पाहिल्यावर वाटलं किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांना व.पुं ची पत्रोत्तरे लाभली असतील. सही तर इतकी वळणदार आणि झोकदार आहे की घाटातली वळणे पण लाजतील.
             तर तिकीट मिळाल्यामुळे , आता व. पुं ची भेट होणार हे निश्चित होतं ! शेवटी ती संध्याकाळ आली ! ज्या वेळेची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ असताना मात्र मी गप्पा मारत बसलो होतो. आपल्याला जायचे आहे हे विसरलो होतो. शेवटी ९:० ० वाजू लागले तेंव्हा वडिलांनी आठवण करून दिली ," अरे तुला जायचं न कथाकथनाला ? जा तयार हो  … ९:० ० वाजले ना !!". डोक्यात ट्यूब पेटली ," अरे हो खरंच की … विसरलोच होतो मी !" तयार होऊन एम - ८ ० ला किक मारली कि २० मिनिटामध्ये नाट्यगृहामध्ये हजर ! बऱ्यापैकी  गर्दी होती. काहीवेळाने पडदा बाजूला झाला आणि रंगमंचावर व.पु. प्रेक्षकांना नमस्कार करत अभिवादन करत होते. त्या वेळेस व.पुं चे वय होतं ६८ ! प्रेक्षागारातले दिवे प्रथेप्रमाणे बंद झाले होते पण व. पुं नी ते परत लावायला सांगितले. नंतर कथाकथनाला सुरुवात झाली. मी आधी कधीही न ऐकलेली 'श्रीमंत रघुनाथराव पेशवे' ही कथा ऐकवली ( 'झोपाळा' ह्या कथासंग्रहात  ती नंतर वाचायला मिळाली.). वयोपरत्वे आलेला थकवा त्यांच्या कथाकाथानात कुठेही आड आलेला जाणवला नाही.  नेहेमीच्या शैलीत त्यांनी कथा सदर केली आणि टाळ्याच्या गजरात ती संपली, मध्यंतर झालं.        
           मध्यंतरानंतर पडदा उघडला आणि व.पु बोलू लागले, " बऱ्याच प्रेक्षकांनी मध्यंतरात येउन एक फर्माईश केली आहे की 'भदे' कथा ऐकवां ! सगळ्यांना चालेल का ?". प्रेक्षकामधून "हो . . चालेल" असा प्रतिसाद आणि टाळ्या !मी पण  खूष झालो  कारण ती माझी आवडती कथा आहे … नेहेमीच्या रंजक आणि विनोदाची पेरणी करत त्यांनी कथेचा समारोप केला. कार्यक्रम संपला आणि मी "आज व.पुं ना बघितले आणि ऐकलं ' ह्या आनंदामध्ये मी एम-८० ला किक मारून घरी निघून आलो.  कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या पायावर डोके ठेवावे आणि आशीर्वाद घ्यावा , त्यांची सही घ्यावी , चार शब्द बोलावेत जसे जमतील तसे असं  काहीच मला सुचलं नाही. का ? आता विचार करतो तर स्वतःचाच राग येतो. तो बहुतेक त्यांचा शेवटचा कार्यक्रम असावा कारण वर्षा-दीड वर्षातच त्यांच्या निधनाची बातमी आल्याचं मला आठवतंय ! त्या आधी मी त्यांना एक लांबलचक पत्रही पाठवलं होतं आणि त्यांच्या हस्ताक्षरात उत्तर येईल ह्या अपेक्षेने वाट पाहात होतो.वेळ, संधी असूनही प्रत्यक्ष 'भेट' राहूनच गेली. तेंव्हा साली अक्कलच नव्हती हेच खरं ! ( आता आहे अशातला भाग नाही :) ) त्यामुळे ती राहून गेलेली 'भेट' ही खंत, ते कथाकथन प्रत्यक्ष ऐकायला मिळालं ह्याच्या समाधानाने भरून थोडीच येणार आहे ? …. कारण नमस्कार करायचा राहिला तो राहिलाच !!

         दुसरी भेट आहे अगदी परवा-परवाची - प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक गुलझारांची !! ह्या वेळेसही वर्तमान पत्रातालीच बातमी -- गुलझारांची प्रकट मुलाखत टिळक स्मारक मध्ये होणार आहे. प्रवेशिका - अक्षरधारा बुक gallery  मध्ये उपलब्ध आहेत. गम्मत म्हणजे हे ठिकाण पण घरापासून खूप लांब! तरीही सुदैवाने मुलाखतीच्या दिवशीसुद्धा सकाळी प्रवेशिका उपलब्ध होत्या म्हणून मी १ ० :३०  ला तिथे पोहोचलो. मजेशीर गोष्ट कि  पुस्तकांच्या दुकानाचे नाव इंग्रजीत - बुक gallery - ते हि पुण्यात ! गुलझारांचा मी खूप  पूर्वीपासून fan आहे. त्यांच्या सिनेमांचा , गाण्यांचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या  खर्जातल्या आवाजाचा ! एखाद्या कसलेल्या नटाला लाजवेल असा त्यांचा आवाज आहे. त्यांचा 'इजाजत' सिनेमा जेंव्हा मी पहिल्यांदा पाहीला तेंव्हा असे वाटले कि नेहेमीच्या पठडीपेक्षा काहीतरी वेगळे आपण पाहतोय असे वाटलं. नवरा-बायको-प्रेयसी ह्यांच्या नात्यांची फारच सुंदर मांडणी त्यांनी केली होती. त्यातली गाणी तर अप्रतिमच - 'मेरा कुछ सामान' आणि 'कतरा कतरा मिलती हैं' उत्कृष्टच ! ते करत असलेल्या प्रतिमांचा वापर, शब्दाचं अचूक प्रयोजन, प्रसंगानुरूप गाणी लिहिण्याची त्यांची हातोटी आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगण्याची त्यांची कला ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी लिहिलेली गाणी पुनः पुन्हा  ऐकावीशी वाटतात. त्या गाण्यांचा गोडवा कमी व्हायला तयारच नाही.
               'अंगूर' हा शेकस्पीअरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स' ह्या नाटकावर आधारित सिनेमा विनोदी चित्रपटांचा मैलाचा दगड ठरला. विनोदी सिनेमा कसा असावा ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना हे नाटक इतके आवडले होते कि त्यांनी आधी त्यावर 'दो दुनी  चार' हा सिनेमा बनवला पण तो फारसा चालला नाही. पण त्यांना नाटकाच्या कथेवर फार विश्वास होता म्हणून त्यांनी परत 'अंगूर' बनवला जो तुफान चालला. आजकालच्या विनोदी चित्रपटांना 'अंगूर'ची सर येणार नाही! त्यांचे 'आनंद' सिनेमातले संवाद ही  खूप गाजले.संवाद लिहिणे असो कि गाणे मोजक्या शब्दात मोठा आशय सांगणे हि किमया  गुलझारांनी लीलया साधली. 'मासूम','लिबास', 'आनंद', 'इजाजत', 'नमकीन', 'आंधी' ह्या चित्रपटातील श्रवणीय गाणी  आणि तितकेच अर्थवाही संवाद याची साक्ष देतात. त्यांच्याबद्दल  पुष्कळ सांगता येईल पण भेटीचे सांगणे राहून जाईल.
               तर मी पोहोचलो तर बाहेर प्रवेशिका संपल्याचा बोर्ड लावला होता. परत स्वतःचा राग आला की लवकर का येऊ शकलो नाही आपण ?  म्हटलं आता आलोच आहे तर एक-दोन पुस्तक घेऊन जावं म्हणून मी दुकानात जाऊन पुस्तके चालू लागलो. तेवढ्यात आठवले कि बा.भ. बोरकरांचे 'चांदणवेळा' हा कविता संग्रह घ्यायचा होता म्हणून मग जिना चढून काव्य विभागात गेलो. पुस्तक शोधत असताना सहज खाली नजर गेली तर प्रत्यक्ष गुलझार साहेब आले होते. आपल्या नेहेमीच्या पांढऱ्या शुभ्र पोशाखात ! त्यांनीच हिंदी मध्ये अनुवादित केलेल्या 'कुसुमाग्रजांच्या' कवितेचं पुस्तक ते बघत होते. त्यांना कुसुमाग्रज आणि शांत शेळके ह्यांच्याबद्दल विलक्षण आदर !! त्या आदरापोटी आणि मराठीची आपल्या हातून थोडी सेवा घडावी म्हणून त्यांनी मोठ्या मेहनतीने कुसुमाग्रजांच्या कविता हिंदी मध्ये अनुवादित केला. ह्या गोष्टीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता. इतर लेखकांची पुस्तकेही ते कुतूहलाने बघत होते. त्यांच्या सभोवताली गर्दी अपेक्षेप्रमाणे !! त्या वेळी मला त्या दुकानाच्या मालकाचा हेवा वाटला. ह्या वेळेस मी मनोमन ठरवलं की त्यांची सही तर घ्यायचीच पण व.पु. च्या भेटीवेळेस जी चूक  केली ती परत करायची नाही.
           रिवाजाप्रमाणे दुकानाच्या स्टाफ बरोबर फोटो , सह्या हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर ते चहा-पाण्यासाठी वर काव्य विभागात जाऊन बसले. तोपर्यंत मी खाली आलेलो होतो. तरी त्यांची सही घ्यायला कोणी न कोणी वर जातच होते. पण मला काही कोणी वर जाऊ देइना! मालक रागावतील , गुलझार साहेब चिडतील अशी फालतू कारणे सांगू लागले. त्यांच्यातलाच एक जण जाऊन त्यांना कविता ऐकवून आला जी त्यांनी खूप शांतपणे ऐकून घेऊन कौतुक  पण केले. पण मी जायचा म्हटले की "नाही"! शेवटी मी ठरवले कि ते जायला निघाले कि त्यांना गाठायचे !  थोडया वेळाने गुलझार साहेब खाली आले आणि स्टाफ च्या लोकांना नमस्कार करत म्हणाले ," बहोत ख़ुशी हुई आप सबसे मिलकर … अब इजाजत दिजीये ", आणि  तसेच गरकन आमच्याकडे वळून म्हणाले ," चलता हुं !!….  नमस्कार ! " . मी लगेच  झालो आणि म्हटलं ," Excuse me sir, ... autograph please". त्यांच्याच 'देवडी' हे पुस्तक पुढे केले. मीच पेन मागितला  कोणी तरी त्यांना पेन दिला. तेवढ्यात मी लगेच  त्यांच्या पायाला हात लावत नमस्कार केला.  संकोचून मला दंडाला हात  लावून उठवत ते म्हणाले ," अरे बस बेटा … ". मग डोळ्यावरचा चष्मा  तोंडात धरला आणि "To You" असा लिहित त्यांनी त्यांची सही केली. वास्तविक मी माझे नाव सांगायला पाहिजे होतं पण  मोठ्या माणसाला समोर बघून मी नि:शब्द झालो होतो. सही करून त्यांनी पुस्तक
मला परत दिलं आणि स्मित हास्य करत ते दुकानाबाहेर पडले. नशीब इतके चांगले होते त्या दिवशी कि प्रत्यक्ष मुलाखत ऐकायला नाहीमिळाली  तरी संध्याकाळी मला टी . व्ही वर बघायला मिळाली. प्रवेशिका संपली असताना त्यांची भेट आपसूक होणं हा एक योगायोग आणि तीच मुलाखत टी . व्ही वर बघायला  हा  दुसरा योगायोग !! त्या दिवशी त्यांनी सगळ्या प्रेक्षकांना सह्या दिल्या ….  तसं  त्यांनी जाहीर केले आणि खरंच करून पण दाखवले !! केवढा मनाचा मोठेपणा …. आणि साधेपणा तर पोशाखापासून ते  वागण्यापर्यंत  ठायी ठायी दिसतो !! आता तर त्यांची गाणी ऐकताना हाच प्रसंग  डोळ्यासमोर येतो. त्यांच्या गाण्यांचा नशा फ्रेंच वाईन सारखा आहे …. जितक्या वेळेस ऐकाल तितका नशा  वाढतच जातो ..उतरायला तयारच नाही !! मलाही त्याच नशेत रहायचं आहे!
--  भालचंद्र देशमुख

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...