५ ऑग, २०१२

रिटर्न गिफ्ट

       मागच्या वर्षी फ्रेंडशीप डे ला मी "सहजच" म्हणून ब्लॉग लिहिला होता. ह्याच दिवशी मला लिहिण्याची उर्मी येते असे नव्हे :) पण माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये जितका आई-वडिलांचा वाटा आहे तितकाच तो मित्रांचाही आहे. तसा तो असतोच हे कोणीही मान्य करेल. म्हणून त्यांच्यातल्या काहींविषयी मला जे प्रकर्षाने जाणवते ते सांगावे म्हणून हा प्रपंच.मागच्या वेळेस काही मित्र-मैत्रिणींबद्दल त्यांची नावे न घेता सांगितले, त्यातल्या काहींना ब्लॉग वाचल्यावर कळले असेलच. आजही अशाच दोघांबद्दल मी बोलणार आहे. त्यातला एक माझा अकरावीपासूनचा मित्र. आमची मैत्री कशी झाली म्हणजे तो प्रसंग कोणता हे मलाही आठवत नाही आणि त्यालाही !! अचानकच त्याने  शाळूसोबती असल्यासारखा बोलायला सुरुवात केली आणि आम्ही कधी एकमेकांचे मित्र बनलो हे कळलंच नाही. आज त्याची आठवण झाली कारण कालच त्याच्याकडे जाऊन आलो. झालं असं मी एक पत्ता शोधत होतो काही केल्या सापडेना. ज्यांच्याकडे जायचे होते त्यांना नीट सांगता येईना. मग वैतागून माझ्या ह्या मित्राला फोन केला. बिचारा नुकताच झोपून उठला होता पण त्याने फोन घेतला आणि त्याला पत्ता विचारला. त्याच्या बोलण्याने माझा संभ्रम अजूनच वाढत होता. तो खरे तर बरोबर सांगत होता ( हे नंतर कळले मला !!) पण मी चिडलो आणि बोलण्यातून आई-वडिलांच्या देखत एक सणसणीत शब्द गेला ( जो फक्त त्याला आणि मला समजला!!).ह्या शब्दाची देवाणघेवाण आमच्यामध्ये होत असलेल्या संवादामध्ये अधूनमधून होत असते पण रागाने नव्हे !! आज मात्र माझ्या तोंडून वैतागापोटी तो शब्द गेला. हे सगळे होऊनही तो स्वतः मला त्याची गाडी घेऊन पत्ता दाखवायला आला. पत्ता मिळाल्यावर जाताना "घरी येऊन जा" असे सांगून तो गेला. मला काही राहवेना, मी त्याला "सॉरी" चा SMS केला. त्याच्यावर त्याच उत्तर आले कि 'तसे' का बोललास मला ?मी म्हटले, "चिडलो होतो रे !! परत एकदा सॉरी" त्यावर त्याचे उत्तर, "हा हा :) अरे तुझी मजा घेत होतो.तूच तर एक जिवा-भावाचा मित्र आहेस." वास्तविक माझ्या रागाचा भडका त्याच्यावर कॉलेजच्या दिवसात बऱ्याचदाउडाला आहे. पण ह्याने कधीही उलटून माझ्यावर राग व्यक्त केलेला नाही .. एकदाही नाही !! नुसते हसून माझा राग निमुटपणे सहन करणारा हाच एकच मित्र असावा कदाचित !!
त्याच्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही कारण नवीन नोकरी होती आणि सुट्टी नाही मिळाली. पण नंतर काकू मला म्हणाल्या," तुझी खूप वाट पाहत होता. बोहोल्यावर चढेपर्यंत म्हणत होता कि जग इकडचा तिकडे
झाले तरी भालचंद्र नक्की येणार. फार नाराज झाला होता तू नाही आलास तर !! ". मला फार फार वाईट वाटले. एकूणच माझ्याकडून त्याच्यावर अन्यायच झालाय आतापर्यंत !! माझ्या मैत्रीत असे काय आहे जे त्याने घट्ट धरून ठेवले आहे .. खरंच कळत नाही !! फ्रेंडशीप डे च्या आदल्याच दिवशी जिवा-भावाच्या मित्रावर चिडणारा मी !! आणि माझा राग निमुटपणे सहन करून त्याची कुठेही वाच्यता न करणारा तो !! मला "बी.एन. खूप खूप लिही .." असे माझे पहिले लिखाण वाचाल्यावर मला सल्ला देणारा! जो मी अजून पूर्णपणे पळत नाही. तो इंग्लिश मेडियम चा असल्यामुळे त्याला माझे लिखाण पूर्णपणे कळतच असं नाही. पण मी काही लिहलंय तर ते त्याने वाचलंच पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. तो आमच्या घरातलाच एक असल्याने कधी कधी वादविवादात माझ्या आईची बाजू घेतल्यावर मी त्याला "काकूंचा चमचा" असे चिडवतो. माझा वाढदिवस कधीहि न विसरणारा, आवर्जून अधून मधून फोन करणारा - "तुला कधी माझी आठवण येत नाही तरी मला वाटते बऱ्याच दिवसात तुझ्याशी बोललो नाही" अशी प्रेमळ तक्रार करणारा !! माझ्यापेक्षा जास्त त्यालाच खरे तर मैत्री काय असते, कशी निभवायची आणि कशी टिकवायची हे कळले आहे. मी त्याबाबतीत अजूनही त्याचा विद्यार्थीच आहे हे मात्र खरे !! त्या माझ्या मित्राला - मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
          दुसरा मित्राबद्दल मी आज फार आनंदात आहे. कारण बऱ्याच वर्षाच्या एकांतवासानंतर त्याचे नुकताच लग्न झाले आहे. आई-वडिलांचे छत्र तो कॉलेजमध्ये असतानाच नियतीने हिरावून घेतले. तेंव्हापासून हा आणि त्याचे भाऊ-बहिण आपल्यापरीने झगडत स्वतःच्या पायावर उभे आहेत. आई-वडिलांच्या आंतरजातीय विवाहामुळे दुरावलेले नातेवाईक त्यामुळे आपले म्हणावे असे कोणी असेलच तर मित्र-परिवार !! माझ्यापेक्षा ४-५ वर्षाने मोठा आहे. पहिली-वहिली  महद्प्रयासाने लागलेली नोकरी मी जेंव्हा वैतागून घरी न सांगता तडका-फडकी सोडण्याचा निर्णय घेतला तेंव्हा मोठ्या भावासारखा "असे करू नकोस .. राजीनामा देऊ नकोस .. " असे फार आत्मीयतेने सांगणारा हा मित्र !! मी त्याच्यासाठी काही केले असेल तर इतकंच कि पुण्यात तो आल्यावर राहण्याची त्याची अडचण मी तात्पुरती सोडवली. माझ्याबरोबरच त्याला माझ्या घरीच ठेवून घेतले. ह्यात फार काही मी केले असे मला आजही वाटत नाही पण तो मात्र ह्याची कृतज्ञता पुन्हा पुन्हा व्यक्त करतो. त्याचे वय वाढत असल्यामुळे मी आणि आमचे मित्रराष्ट्र त्याला लग्न कर म्हणून मागे लागलो होतो. पण तो काही गंभीरपणे घ्यायला तयार नव्हता. त्याचं ह्या वाटेत तर किती अडचणी!! स्वतःच शोधा-शोध करायची आणि स्वतःच सगळे ठरवायचे !! पण त्याच्या प्रयत्नांना यश आले .. लग्न ठरले तेंव्हा आवर्जून घरी पत्रिका द्यायला आला. मला म्हणाला कि "मला कोणतही कारण चालणार नाही. तुला लग्नाला यावंच लागेल नाही तर बोलणे बंद करेन". म्हणून मी ठरवलंच होते कि त्याच्या लग्नाला कितीही विघ्ने आली तरी जायचंच!! पण मी जे काही ठरवतो ते नियतीला मान्य नसावे. माझ्या जुन्या "कोलायटीस" च्या दुखण्याने तोंड वर काढले आणि मला बाहेरचे खाण्या-पिण्यास डॉक्टरांनी मनाई केली. सक्त ताकीद दिली कि बाहेरचं काही खाशील तर पुन्हा त्रास होईल !! झालं !! इच्छा असूनही जाता आले नाही. एका मित्राकरवी निरोप दिला कि ह्या कारणाने येऊ शकत नाही असे सांग आणि शुभेच्छा दे!! नंतर तो ऑनलाईन भेटला तर मी विचारले,"कसा आहेस? माफ कर येऊ शकलो नाही .. इच्छा असूनही !!" , त्यावर त्याचे उत्तर," मी विचारले पाहिजे .. तू कसा आहेस ? .. बरा आहेस न ? काळजी घे !! ". नंतर त्याचा सविस्तर फोन पण आला. आता तो मजेत आहे. संसारी झाला आहे. मला विचारले,"घरी कधी येतोस ? .. जेवायलाच ये !! बरा झालास कि सांग .. ". मुळात शिडशिडीत असणाऱ्या , ह्या परोपकारी मित्राचा एकांतवास संपला ह्याचा मला आज खरच आनंद आहे. तो तसा आमच्या मित्रा-राष्ट्राला पण नक्की झाला असणार !! म्हणूनच त्याच्या लग्नाचा आपण साक्षीदार असावे अस मला फार वाटत होते पण नियतीने मला अशी संधी दिली नाही. पण कसलाही कडवटपणा न ठेवता आजही माझ्या प्रवासात माझ्या बरोबर आहे. एकट्याने संघर्ष करणार्यांच पाठिंब्याचे महत्व कळत असतं !! आजच्या दिवशी खरे तर मी त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या पाठीशी असल्याचे सांगायला हवे पण माझी खात्री आहे कि असे तोच मला म्हणेल कारण मोठा आहे ना माझ्यापेक्षा !!
     हेच आतापर्यंत मला मैत्रीच्या निमित्ताने वेग-वेगळ्या स्वरुपात गिफ्ट्स देत आले आहेत. परत तरीही त्याचा उल्लेख रिटर्न-गिफ्ट्स असाच करतील.नियतीला माझे एवढंच  म्हणणे  आहे कि मला पण कधी तरी रिटर्न गिफ्ट देण्याची संधी मिळू दे.मी ह्या दोघांच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे ते वेळोवेळी आपल्या कृतीतून,उक्तीतून दाखवत असतात पण मला ते कधी आणि कसे जमेल खरंच माहित नाही ... आणि प्रांजळपणे खरं सांगायचं तर कळतही नाही !!

- भालचंद्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...