४ जाने, २०१५

पुस्तकांच्या सहवासात


नव्या वर्षाचा पहिला लेख ! ह्याच शीर्षकाचा मला एक धडा होता शालेय अभ्यासक्रमात …. अर्थातच मराठी पाठ्यपुस्तकात कदाचित आठवी किंवा नववीत असावा. लेखक - डॉ . बाबासाहेब आंबेडकर. तत्कालीन सवर्ण समाजाने बहिष्कृत केलेल्या समाजातल्या एका मुलाला पुस्तकांचा सहवास काय देऊन गेला आणि तो मिळावा ह्यासाठीचा करावा लागणारा संघर्ष ह्याचं चित्रण ! मला तो धडा आठवतो ह्याचे कारण डॉ . श्रीराम लागू ह्यांनी केलेले त्याचं अभिवाचन - त्यांच्या धीर-गंभीर आणि खर्जातल्या आवाजातले ते वाचन मनाचा ठाव घेते. त्याचा परिणाम अजून अधून मधून जाणवत राहतो. अजून एक धडा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा -  डॉ. लागुंच्याच आवाजातला - "अंदमानचे दिवस " असं शीर्षक असावं कदाचित ! तो ही असाच मनाला भिडणारा ! असो तर सांगायचा उद्देश की  "पुस्तकांच्या सहवासात" हे शीर्षक मला ह्या लेखाला योग्य वाटते कारण मी पण पुस्तकांच्या सहवासाबद्दल बोलणार आहे. शीर्षक तेच असले तरी रोख नक्कीच वेगळा असणार आहे. संघर्ष वगैरे असे नक्कीच काही सांगणार नाहीये कारण तो मला कधीच करावा लागला नाही. सुदैवाने माझ्या आई-वडिलांना वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकांचा वावर मी  शाळेमध्ये असल्यापासून माझ्या आसपास आहे. असं असूनही माझ्या भावाला वाचनाची आवड लागली नाही.  त्यामुळे माझी वाचनाची आवड लागण्यापासून ती आतापर्यंत जोपासण्यापर्यंतचे श्रेय नक्कीच माझ्या आई-वडिलांना द्यायलाच हवं. असे आई-वडील मला लाभले हे माझे भाग्य आहे कि ज्यांनी मला तू हे पुस्तक का आणलेस असं कधीही विचारले नाही उलट  अमुक एक पुस्तक आपल्याकडे नाहीये तर ते आण आठवणीने असंच सांगतात …. अजूनही !

चंपक , ठक-ठक , चांदोबा, किशोर  - हिंदी मधे चाचा चौधरी , रमण , बिल्लू , पिंकी इथपासून सुरु झालेला माझा वाचनाचा प्रवास कॉलेज मध्ये येईपर्यंत साप्ताहिक सकाळ , लोकप्रभा , लोकसत्ताच्या रविवारची मैफल पुरवणी , पु.ल , व. पु , शांता शेळके , व्यंकटेश माडगुळकर , आचार्य अत्रे , शंकर पाटील, द. मा. मिरासदार, चिं. वि  जोशी, रणजित देसाई, अनिल अवचट, शोभा चित्रे ह्यांचे साहित्य वाचनापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आतापर्यंत विश्वास पाटील, गिरीश कुबेर , संदीप वासलेकर, वसंत कानेटकर , विजय तेंडुलकर, सुनीता देशपांडे, के रं शिरवाडकर, जयवंत दळवी , प्रशांत दळवी , अजित दळवी ,प्रकाश नारायण संत, मिलिंद बोकील असे बरेच वाचून झाले आहेत आणि चालूच आहे. बरेचसे पुस्तके आणि लेखक विस्मरणात गेलेत तो माझ्या स्मरणशक्तीचा दोष !

वाढत्या वाचनाने अभिरुची बदलत राहते. एकाच प्रकारचे वाचन होत नाही त्यात विविधता येत राहते - तशी ती यायलाच हवी कारण वाचन चौफेर असायला हवे असं माझ्या वडिलांनी मला लहानपणी सांगितल्याचं आठवतं. असे असले तरी काही लेखकांच्या लिखाणाचा पगडा इतर लेखकांपेक्षा जरा जास्तच असतो. जसं व्यक्तिचित्र लिहिण्यामध्ये पु ल , व पु , श्री म माटे ,व्यकंटेश माडगूळकरांचा हातखंडा होता. पु. ल त्यात अग्रणी आहेत हे नि:संशय.  मग ते "व्यक्ती आणि वल्ली "  वा "गणगोत " किंवा "मैत्र". प्रत्येक व्यक्तिचित्राचा शेवट तर ते इतका छान करायचे की त्यातून त्यांचा त्या व्यक्तिमत्वाविषयी असलेलं ममत्व प्रतीत होतं. काल्पनिक व्यक्तिचित्र असेल तर शेवट मिश्किल किंवा क्वचित हळवा ! गणगोत मध्ये त्यांनी काही व्यक्तिचित्रे तर इतक्या ममत्वाने लिहिले आहेत कि वाचल्यावर गहिवरून यावे. आपल्या श्वशुराविषयी इतक्या ममत्वाने लिहिणारे पु ल निराळे आणि इतका जिव्हाळा देणारे सासरे देखील दुर्मिळ !
आप्पा - ह्या आपल्या श्वशुरांच्या पहिल्या भेटीविषयी ते लिहितात - "अप्पांनी "या" म्हणून मला आपल्याजवळ बसवून घेतले आणि आपली लेक जणू काय दहा गावची जहागीर असलेल्या जहागीरदाराच्या एकुलत्या एका मुलाला द्यायची आहे अशा सौजन्याने विचारले ,"आमची मुलगी पसंत आहे ना तुम्हांला ?" हे विचारताना एखाद्या लहान मुलाच्या पाठीवरून फिरवावा तसा ते माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत होते. इतक्या प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवून "तुम्हांला मी माझी मुलगी देऊ इच्छित नाही" असे जरी त्यांनी सांगितले असते तरी मी ते आनंदाने मान्य केले असते. त्या काळात मला त्या मायेची अधिक आवश्यकता होती. जीवनातले प्रत्येक दान उलट पडत होते. अडथळ्याशिवाय घास उतरत नव्हता"

ज्यांच्या अंतःकरणात मायेचा ओलावा असतो त्यांच्याच लेखणीतून असं ममत्व आणि जिव्हाळा पाझरू शकतो. उत्तम लेखक किंवा कलावंत होण्यासाठी आधी तो आधी एक चांगला माणूस असावा लागतो असं म्हणतात. पु लं च्या बाबतीत हे तंतोतंत पटतं. ह्याच व्यक्तिचित्राचा शेवटही खूप हृद्य आहे. ते लिहितात - "आम्हांला कुठल्याही साधूच्या दर्शनाला जावेसे वाटत नाही याचे कारण आमच्या घरातच आप्पांच्या रूपाने एक सुखदु:खे समे कृत्वा जगणारा वैष्णव वावरतो आहे. पुर्वासुकृताची जोडी म्हणून आप्पांना विठ्ठलाची आवडी आहे. आम्हांला आप्पांची आवडी आहे, ही आम्ही केलेल्या कुठल्या सुकृताची जोडी आहे हे विठ्ठलच जाणे "
असंच "रावसाहेब" आणि "रामूभय्या दाते" ही व्यक्तिचित्रे पण भारावून सोडणारे आहे. पु लंच्या आवाजात "रावसाहेब" ऐकल्यावर ते जास्तच जाणवते. एका रांगड्या, शिवीशिवाय ( तेही 'भ'काराने सुरू होणाऱ्या ) एकाही वाक्याची सुरुवात न करणाऱ्या , संगीतावर आणि त्याहूनही दोस्तांवर जीव लावणाऱ्या अवलियाच्या व्यक्तीमत्वात दडलेली अस्सल माणुसकी पु लं नी रावसाहेबांमध्ये अचूक हेरली. त्यातली काही वाक्य बोलताना पु ल भावुक झाल्याचं जाणवतं.
रामूभय्या दाते हे पण उमदे व्यक्तिमत्व - आय. ए .स असूनही खाण्यापासून ते गाण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत रुची ! दाद द्यायची तीही भरभरून - मग ती दाद गाण्याला असो वा खाण्याला - खास इंदोरी शैलीतली ! पु. ल.वर लेखक म्हणून नव्हे तर एक माणूस ह्या लोकांनी केवढा जीव लावला होता हे गणगोत वाचल्यावर लक्षात यावे.

असाच काहीसा अनुभव - व्यंकटेश माडगुळकर ह्यांचे - "माणदेशी माणसे " किंवा श्री म माटे ह्यांचे "उपेक्षितांचे अंतरंग" वाचल्यावर येतो. गावाकडच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या लोकांबद्दल - त्याचं जगणं , छोट्या -छोट्या अंधश्रद्धा हे पण ओघाने येतच.पण ह्या सगळ्यांमध्ये अस्वस्थ करणारं लिखाण असेल तर ते अनिल अवचट ह्याचं "माणसं" हे पुस्तक ! कामगार वर्गातल्या लोकांचं जगणं - निपाणी मधले विडी मजूर , गुळाच्या ढेपा वाहणारे हमाल , मिरची गोदामात काम करणारे हमाल, डोक्यावरून फरशी वाहून नेणारे हमाल, कैकाडी समाजातले लोक - त्यांची व्यसन , त्यांचे आजार , त्याचं मालक वर्गाकडून चाललेले शोषण असं सगळे सविस्तर त्यांनी मांडलय. ते वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो कधी कधी ! आपलं जग फार वेगळं आहे त्यामुळे पानोपानी धक्के बसतात वाचताना. अवचटांचे "स्वतःविषयी" हे ही वाचनीय पुस्तक आहे - स्वतःचा एका तिऱ्हाईत सारखा घेतलेला शोध असं त्या बद्दल सांगता येईल. आपण स्वतःकडे कधी नीट पाहातच नाही. अगदी कोणालाही तुमच्यामध्ये सर्वस्वी फक्त तुमचाच असेलेला आणि जगात दुसऱ्या कोणाकडेही नसणारा एक वैशिट्य किंवा गुण सांगा असा प्रश्न विचारला तर किती लोकांना ते नेमकेपणाने सांगता येईल ? बघा प्रयत्न करून जमतंय का

बरेच जण मला असे म्हणतात की ही अशी पुस्तकं ( म्हणजे - "माणसं" सारखी ) तू का वाचतोस ? आधीच आपल्याला टेन्शन्स काही कमी आहेत का? उगाच असे वाचून अजून frustrate व्हायची गरजच काय ? माझं मत वेगळं आहे - असं वाचल्यावरच आपले प्रश्न आणि समस्या छोट्या वाटायला लागतात. आपलं जगणं किती सुसह्य आहे ह्याची जाणीव होते. म्हणूनच पुस्तकांचा सहवास मनाला उभारी देणारा आहे, आश्वस्त करणारा आहे आणि जगण्याला बळ देणारा आहे.

अशीही काही पुस्तके आहेत जी वाचायला सुरुवात केली तर खाली ठेवावीशी वाटत नाहीत. विश्वास पाटील ह्यांचे - "पानिपत" किंवा गिरीश कुबेर ह्यांचे "एका तेलियाने". पानिपत वाचताना तर रक्त उसळायला लागतं इतकं ते वाचनीय झालंय. प्रत्यक्ष कुसुमाग्रजांनी त्यांचे कौतुक केलंय तर मी जास्त बोलणे बरे नव्हे.
"एका तेलियाने" पण अप्रतिम आहे - तेलाभोवती फिरणारे जागतिक राजकारण आणि हे सगळे एकहाती नियंत्रित करणारा सौदी अरेबियाचे तेलमंत्री - यामानी !
गिरीश कुबेरांनी ( जे सध्या लोकसत्ताचे संपादक आहेत ) इतकं रंजक लिहिले आहे की एक प्रकरण वाचल्यावर दुसरं कधी सुरू करतो असे होते. त्यांचा ह्या विषयातला अभ्यास पानोपानी जाणवतो.
प्रभारकर पेंढारकर ह्याचं - "रारंग ढांग " किंवा रणजित देसाई ह्याचं - "श्रीमान योगी " , वि.स. खांडेकरांच - "ययाति". ही पण ह्याच वाचनीय वर्गात मोडणारी

व. पुंच नाव घेतल्याशिवाय लेख संपवणे निदान मला तरी जमणार नाही. शब्दांवर जबरदस्त प्रभुत्व असलेला लेखक ! त्यांची "पार्टनर"  "तू भ्रमत आहासी वाया" ह्या कादंबऱ्या माझ्या विशेष आवडीच्या आहेत. दोन्ही कादंबऱ्यांमध्ये तत्वाद्यानाप्रती भासणारी त्यांची ओघवती भाषा शैलीमुळे त्या पुनः पुन्हा वाचाव्याशा वाटतात. त्यांनी fantasy  हा  प्रकार मराठी कथेमध्ये खूप छान वापरला. मग ती भांडणासाठी क्लासेस काढणारा जोशीची कथा असो वा भुताने बेजार असलेल्या दामलेंची गोष्ट असो. दुसऱ्यांचे आजार आपल्याकडे तात्पुरते घेणारे "भदे" असो किंवा कुठेही काहीही लिहून ठेवणाऱ्या सवयीमुळे अडचणीत आलेल्या "अविनाशची" गोष्ट असो. ह्या सगळ्या कथांमध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.त्यांनी "जे. क़े" हे व्यक्तिचित्र तर त्यांच्याच आवाजात ऐकावे असंच आहे. पुष्कळ जणांना माहित नसेल पण मराठी चित्रपट "मुंबईचा जावई" ह्या चित्रपटाची कथा व.पुं चीच !
त्याचं "माणसं" नावाचे एक छान पुस्तक आहे. कथा , त्यांना आलेले माणसांचे अनुभव , काही त्यांच्याच आयुष्यातले प्रसंग अशा विविध तऱ्हांनी ते पुस्तक सजलंय. कुठलंही पान काढून वाचायला सुरू करावे असे ! "रंगपंचमी" हेही पुस्तक असंच - एखाद्या सुंदर उद्यानाचा प्रवास वाटावा तसं हे पुस्तक वाचताना वाटत राहात. ज्यांना वाचायचाच मुळात कंटाळा आहे त्यांनी "रंगपंचमी" पासून सुरुवात करावी. त्यांच्या पुष्कळ कथांवर लघुपट , चित्रपट आणि नाटकं निघू शकतात. त्यांच्या कथांमध्ये ती ताकत नक्कीच आहे. गरजूंनी नक्की ह्यावर विचार करावा.

ग्रामीण भागातील व्यक्तिचित्रे आपल्याला विनोदी पद्धतीने कथांमधून मांडणारे द मा मिरासदार , शंकर पाटील ह्यांची शैली सर्वार्थाने वेगळी आणि त्यातली गम्मत वेगळीच ! ज्यांच्या उन्हाळ्याच्या - दिवाळीच्या सुट्ट्या लहानपणी एकाद्या खेडेगावात गेल्या आहेत त्यांना ह्या कथेची गम्मत कळते.
असं अजून बरंच सांगण्यासारखे आहे. मला बरेच जण विचारतात की वाचनाने तुला काय फायदा झाला किंवा वाचनाने तुला काय दिले - एका शब्दात सांगायचं तर आनंद दिला. पण ह्यापेक्षाही बरंच काही दिलं. निराशेच्या प्रसंगात सावरायला मदत केली. चूक कबूल करायला शिकवलं , चुकांची जबाबदारी घ्यायला शिकवलं. तटस्थपणा शिकवला , सहन करायला शिकवलं , आशावादी आणि समाधानी राहायला शिकवलं, दुसऱ्यांच शांतपणे ऐकून घ्यायला शिकवलं …. आणि मुख्य म्हणजे लिहायला प्रवृत्त केलं. अजून किती सांगू ?

म्हणून मी भेट म्हणून मित्रांना-मैत्रिणींना , भावा-बहिणींना  पुस्तकेच देतो. त्यातल्या पहिल्या पानावर पत्रवजा काही तरी  लिहून देतो म्हणजे ते पुस्तक त्यांच्याकडेच राहील ! उद्देश हा की त्यांनी त्या पत्रासाठी का होईना पुस्तक वाचावं. त्याच्यामागे माझा स्वार्थ हा की उद्या माझ्या लिखाणासाठी मला आयते वाचक मिळतील…हा गमतीचा भाग झाला पण खरा उद्देश हा की वाचन करावं लोकांनी …… मराठी वाचन केले तर उत्तमच ! व्रतच घेतलंय असं समजा - वाचनाचा प्रसार करायचं !

मला इतर भाषांबद्दल राग आहे असं कोणी वाटून घेऊ नये. उलट मी अधाश्यासारखा वाचेन जे मिळेल ते ! मला आवडेल उत्तम साहित्य वाचायला मग ते  इंग्रजी असो वा फ्रेंच. मला खुशवंत सिंग वाचायाचाय , अमृता प्रीतम ह्याचं साहित्य वाचायचं आहे , महाश्वेता देवी ह्याचं बंगाली साहित्य वाचायचं आहे , आर के नारायणन वाचायचे आहेत , एस एल भैरप्पा , मार्क ट्वेन , वूडहाउस , डिकन्स, संत ज्ञानेश्वर , तुकाराम , रामदास, बा.भ बोरकर अशी यादी बरीच मोठी आहे …… हे संकल्प कधी पुरे होतील सांगता येणार नाही.... थोडक्यात पु ल म्हणाले होते तसे - I want to love all forms of literature hundred times more but my only worry is that I can not love it enough !

-- भालचंद्र देशमुख 

५ टिप्पण्या:

Sunayna म्हणाले...

Uttam vichaar aahet. Aani asech aaple aayushya he pustkanchya goad sahavaasat aso,
Whether it be English or Marathi, the thoughts are important. And you have conveyed them best.

Amol Dixit म्हणाले...

Lekh khoop avadala. Baryach divsanni P.L., V.P., D.MA., Shivaji Sawant, Vishwas Patil, Ranjit Desai, Shankar Patil ya diggaj lekhakanchi athavn zali. Parat ekada vachin mhantoy. Baki lekh khuoop chan. Dhanyavad!!

Amol Dixit म्हणाले...

Lekh khoop avadala. Baryach divsanni P.L., V.P., D.MA., Shivaji Sawant, Vishwas Patil, Ranjit Desai, Shankar Patil ya diggaj lekhakanchi athavn zali. Parat ekada vachin mhantoy. Baki lekh khuoop chan. Dhanyavad!!

Ruj Paithankar म्हणाले...

Totally Awesome ! :) Memories reloaded.. right from childhood !

Ruj Paithankar म्हणाले...

Wchanane tula kay dila >> bang on ! Couldn't agree more ! karach kiti ani kay sangnar ...

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...