२३ फेब्रु, २०१४

गोष्ट देवाची

देवाचं  आणि माझं फारसं बरं नाही. त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण व्हावी असंच आपल्या आसपास घडत आहे. थोडक्यात सगळ्यांना कळेल अश्या भाषेत सांगायचं तर मी नास्तिक आहे. किंबहुना आता तो शिक्काच माझ्यावर बसला आहे. वास्तविकतः शंकराच्या पिंडीवर उंदीर बागडताना पाहून सावरकर नास्तिक बनले तसे काही माझ्या नास्तिक होण्यामागे कारण नाहीये. जे आहे ते पुष्कळसे स्वतःवर बेतलेले आणि थोडे फार जे वाचन गेल्या काही वर्षात झाले त्या कारणांमुळे ! मला जे हवे होते ते मिळाले नाही म्हणून मी त्याचं खापर देवावर फोडलं असं काही लोकांना वाटू शकतं जे काही अंशी खरंही आहे. पण खरं सांगायचं तर अनिल अवचट ह्याचं "माणसं" वाचल्यावर मी खूप अस्वस्थ झालो होतो. खरं तर तेंव्हाच ह्या "देव" नावाच्या संकल्पनेबाबत मला सतत प्रश्न पडत आले आहेत आणि उत्तरे मात्र अजून मिळायची आहेत. कारण ते अजूनही माझ्यासाठी न सुटणारं कोडं आहे. आता हे मान्य करायलाच हवं की कुमार गंधर्वांचा, लतादीदींचा  किंवा आशाताईंचा आवाज ऐकला की त्या अदृश्य शक्तीचा कधी कधी भास होतो हे खरं ! असो . तर ह्या "देवाची" गोष्ट आपण पुराणातल्या कथांमधून , पुस्तकातून आणि चित्रपटातून वाचायला , पाहायला मिळाली आहे. अशाच एका आवडलेल्या गोष्टीबद्दल किंवा नेमक सांगायचं म्हणजे एका चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. ही काही त्या चित्रपटाची समीक्षा नाही तर मला त्यातले स्वतः नास्तिक असूनही जे आवडलं ते सांगायचं आहे.

चित्रपट आपल्याला काय देतात ? आनंद देतातच पण काही चित्रपटात अंतर्मुख करण्याचीही ताकत असते. चित्रपट संपला तरी विषय डोक्यातच राहतो. तर हा चित्रपट आहे - "Evan Almighty" , जो "Bruce Almighty" चा पुढचा भाग आहे असं म्हणता येईल. त्या पहिल्या चित्रपटाबद्दल पण बरंच बोलता  येईल पण थोड्क्यात ! पहिला भागाचं वैशिष्ट हे की सतत परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही करावं ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्यातली खरी शक्ती ओळखण्याचा प्रयत्न करावा.  देवाने आपल्या सगळ्या शक्ती ब्रूस  दिल्यावर तो सगळ्यांच्या चांगल्या-वाईट ईच्छा पूर्ण करतो ज्यामुळे अंदाधुंद माजते.  मग मात्र तो देवाकडे येतो.  ब्रूस त्याला म्हणतो कि सगळे हाताबाहेर गेलय मला कळत नाही काय करायचं ! मी ज्याला जे हवं होतं ते दिलं !
देव विचारतो, "कधी तुला हा अंदाज आला की लोकांना खरंच काय हवंय ?" ब्रूस विचारात पडतो आणि विचारतो ,"मी काय करायला हवं होतं त्यासाठी ?"
देव सांगतो ," लोकांना वाटते की मी त्यांच्यासाठी सगळे काही करावे पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे." मला वाटते की हाच आस्तिक आणि नास्तिक लोकांमधला फरक आहे. नास्तिकांचा विश्वास स्वतःवर जास्त असतो. असं असूनही ते समाजात टीकेचे प्रसंगी अवहेलनेचे धनी ठरले आहेत … कायमच ! पण मला जास्त आश्चर्य आपल्या समाजाचे वाटते. सतत कर्म-कांड , देव-देव करूनही समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या श्रद्धा ह्या कच-कड्यांच्याच आहेत …… इतक्या की, कोणी जरा तिरके प्रश्न विचारले की मारायलाच धावतील ! एकीकडे टोकाचा ईश्वरवाद इतका की ईश्वरालाच वीट यावा आणि दुसरीकडे त्यातूनच आलेला दांभिकपणा …नास्तिक माणस म्हणजे अश्रद्धच  असणार हे गृहितक !  का ? नास्तिक लोक सश्रद्ध असू शकतात.

दुसऱ्या सिनेमाचे - "Evan Almighty" चे वैशिष्ट्य  हे की ह्यातल्या नायकाला जगात बदल घडवायचा आहे म्हणजे अमेरिकेचा केजरीवाल आहे तो ! म्हणून तो निवडणूक लढवतो आणि व्हाईट हाउस मध्ये दाखल होतो. लोकप्रतिनिधी जसे आपल्याकडे वागतात तसेच तिथेही असतात म्हणजे मैदानांची आरक्षणं बदलून मोठ्या टोलेजंग ईमारती बांधून आपली तिजोरी भरायची असे उद्योग "विकासाच्या" नावाखाली तिथेही होतात. असाच एक सिनेटर नायकाला अश्याच एका विधेयकाला पाठींबा द्यावा म्हणून तगादा लावतो. नायक तयार होतोही पण देव हा बेत यशस्वी होऊ देत नाही ! कसे ? ते चित्रपटात खूप रंजकतेने मांडले आहे. छान गोष्ट ही की देव हा श्वेत वस्त्रातला माणसासारखा दाखवला आहे. भव्य-दिव्य , तेजस्वी वलय असलेलं रूप जे आपल्याकडील चित्रपटात दाखवलं  जातं तसं नाही. तर अचानक नायकासमोर प्रकट होऊन देव त्याला एक मोठी बोट बनवायला सांगतो आणि त्यासाठी सगळी सामग्री पण पुरवतो. नायकाला प्रश्न पडतो की हे का करायचे ? तर देव सांगतो की कारण मला तुमची काळजी आहे म्हणून मी सांगतो तसं कर आणि विश्वास  देतो की बोट बनल्यावर ती भरण्याचं काम तो स्वतः करेल. लोक काय म्हणतील असं नायकाने विचारल्यावर देव सांगतो "प्रलय येणार आहे" असं सांग. नायकापुढे सांगितलेले काम करण्यावाचून पर्याय राहत नाही त्यामुळे तो बोट बनवायला सुरु करतो आणि लोकांच्या टीकेचे कारण बनतो. लोक त्याला वेडे ठरवतात ज्यामुळे त्याची बायको आणि मुले त्याला सोडून जातात. ह्या दरम्यान प्रत्येक प्राण्याचा एक नर आणि मादी असा जोडा त्याच्या घराजवळ जमायला सुरु होतो. कारण प्रलयानंतर उत्क्रांती पुढे चालू राहावी म्हणून ! हे प्रसंग खूप मजेदार झाले आहेत.

त्याची बायको आणि मुले एका हॉटेल मध्ये बसलेले असताना बातम्यांमध्ये नायकाची संभावना चालू असते आणि उपस्थित सगळे त्या चेष्टेत सामील होत मजा घेत असतात. इथे देव वेटरच्या वेशात येतो आणि नायकाच्या बायकोला विचारतो," तू अस्वस्थ दिसतेस ! काही अडचण आहे का?"ती त्याला सगळी हकीकत सांगते.

देव तिला म्हणतो ," मला वाटते ही एका प्रेमकथाच आहे. तू पाहिलंस की कसं एकेक प्राणी आपल्या जोडीदाराबरोबर प्रकट झाले ! कश्याच्या भरोश्यावर? प्रेम आणि आणि परस्परांवर असलेल्या विश्वासावर … एक प्रश्न विचारतो - तुला काय वाटते की कोणी परमेश्वराकडे संयम मागितला तर तो काय देतो ? संयम देतो कि तुमच्या संयमाचा कस लागेल अशी परिस्थिती निर्माण करतो? तुम्ही त्याच्याकडे धाडसी वृत्ती मागितली तर तो धाडसी वृत्ती देतो की तुम्हाला धाडसी होण्यासारखी परिस्थिती निर्माण करतो ? एखाद्याने आपल्या कुटुंबासाठी सुख-शांती-प्रेम मागितले तर ते देतो कि असे कठीण प्रसंग निर्माण करतो की त्यांच्यातल्या प्रेमाची परीक्षा घेतली जाईल ? विचार कर … चल मी निघतो बाकीच्यांची सेवा करायची आहे." हे ऐकून ती माघारी जाते आणि नवऱ्याला मदत करू लागते.  ईश्वराकडून आपल्या असलेल्या अपेक्षा आणि त्याच अपेक्षांकडे देव कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो आणि बदल्यात आपल्या पारड्यात काय टाकतो ह्याचं एक छान चित्र हा संवाद उभं करतं ! महत्वाचा मुद्दा हा पण आहे की उठ-सूठ कर्म-काडांची बरसात करून त्या अदृश्य शक्तीला वेठीस धरणे कितपत योग्य आहे? त्याला किती छळावे ह्याला पण मर्यादा हवी. विशेष म्हणजे जे दिलंय त्याचा निमुटपणे आणि जमले तर समाधानाने स्वीकार करणे ह्यातच शहाणपणा आहे. कधी कधी वाटते की देव नास्तिकांना नक्कीच मनापासून धन्यवाद देत असणार कारण मूठभर का होईना काही लोक आहेत जे त्याला ह्या-ना -त्या कारणांमुळे छळत नाही.

अजून एक छान प्रश्न नायक देवाला विचारतो,"तू खरंच प्रलय आणणार आहेस का? … असे का करणार आहेस तू ?". देव उत्तरतो," कारण तुमच्यावर माझे प्रेम आहे म्हणून ! तुला एक दृश्य दाखवतो एका दरीचे ! जी मी तयार केली होती … हे बघ असे दिसत होते  माझे ओरिजिनल डिझाईन !!!"

ते दृश्य पाहून नायक दिपून जातो," हे कुठले दृश्य आहे?"

देव - "ओळखले नाहीस? … इथेच तुझे आताचं घर आहे … ".

पुढे चित्रपटात दाखवलेल्या धरण फुटीत त्याचे घर वाहून जाते.  हे सांगण्याचं कारण हेच की मागल्या वर्षी उत्तराखंडात जो प्रलय झाला त्यामागे हे तर कारण नसेल की त्या देवाला त्याचं ओरिजिनल डिझाईन बघायचं होतं ? जे आपण माणसांनी पहाडांवर मंदिरे , घरे , धर्मशाळा उभारून विस्कळीत करून टाकलंय. केवळ देव-धर्माच्या नावावर आपण निसर्गाची वाताहत तर करतच आहोत पण त्यामुळे माणसांचाही बळी जातोय ह्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय. म्हणूनच उगाच तीर्थयात्रा करून आणि देवळात रांगा लावून कोणाचे प्रश्न सुटत असतील ह्यावर माझा तर मुळीच विश्वास नाही. पुराणकथांची तर मला गम्मतच वाटते , इंद्राला कोणत्या गुणांवर देवांचा राजा केलं हे पण मला कधी कळले नाही. इतका भित्रा राजा कसा असू शकतो ? 


अगदी अलीकडचं माझ्या वाचनात आलेलं सांगायचं झालं तर गुलजार साहेबांची एक सत्यकथा - "गागी आणि सुपरमैन" - एका छोट्याश्या चिमुरडीची जिला कॅन्सरमुळे  आपला पाय कापावा लागला. पण निरागस वयात तिला
सुपरमैन फार आवडायला लागतो आणि इतका की ती त्याला देवासारखाच ताकतवान समजायला लागते. जेंव्हा तिचा पाय कापावा लागतो तेंव्हा ती तितक्याच निरागसतेने बाबांना विचारते,"पपा , गॉड मला पनिश का करतोय? मी तर काहीच केले नाहीये !". शेवटी तिची आई नकळत बोलून जाते ," देव पण सुपरमैन सारखाच आहे बेटा , फक्त पुस्तकातच सगळे करणे जमते त्याला !"
काही मतभ्रष्ट आता तिच्या पूर्वजन्माचं चर्हाट लावतील.  मग देवाचा हा अन्यायच म्हणावा लागेल ,  जन्माला घालताना सांगायला हवे त्याने की तू अमुक-अमुक पापे केली होतीस तर तुला तमुक-तमुक गोष्टी मिळणार नाहीत आणि ह्या-ह्या गोष्टी भोगाव्या लागतील … मनाची तयारी करायला सोपे होईल !

पण गागीच्या ( आणि  माझ्याही ! ) प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आहेत कोणाकडे ? ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाकडे मी विश्वासाने पाहतोय … बघू उत्तरे मिळतात का ते !

-- भालचंद्र देशमुख

९ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

nice

Unknown म्हणाले...

nice

निनावी म्हणाले...

good one

Rupali म्हणाले...

Oghavati bhasha aahe

anita joglekar म्हणाले...

Khup sunder likhan ahe. Nastik ani aastik he mananyWar ahe majha mate. Generally jewha manus ayashswi hoti tewha tyache khapar nashibalade ani oghane dewakade hate. Pan yashaswi manus matra swatahacha kashtala credit deto. Dev asne nasne hi eek Kalpana ahe. Tumhi antarmukh houn kiti swatacha ayushyat swatahala jhokun deta he majha Drishtine nahatwache ahe. Pan chaa. Ahe lekh ekdM

Aditya Narayan Joshi म्हणाले...

Bhal ,
lekh mast ahe! You might want to read this blog
deepakranade.blogspot.in
Thoughts / observations by neurosurgeon about spirituality n god

Ruj Paithankar म्हणाले...

Mastach re ! Good to know that, you're an Atheist ! :)
This reminds me of a quote by Woody Allen published in one of his article >> "If God exists, I hope he has a good excuse !" \m/

Ruj Paithankar म्हणाले...

Btw, Dhyaneshwari is a indeed a legend !

Rohit Keskar म्हणाले...

Arjun hovun Shrikrushnala sharan janyachi vel aali aahe - Dyaneshwari nakki wacha !

आणीबाणीचे आधुनिक 'पिनोक्यो’

राजनाथ सिंग – जे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आहेत - ह्यांनी ए.एन.आय. वाहिनीला दिलेली मुलाखत ऐकली. स्मिता प्रकाश ह्यांनी ती घेतली होती. त...